- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा: विष्णुसहस्त्रनाम हे १२० श्लोकांचे मोठे स्तोत्र असून या स्तोत्राचे एक सप्ताहभर रात्रं-दिवस एका मिनिटाचाही खंड पडू न देता सलगपणे पाठ करण्याचा विडा भाविकांनी उचलला. भारतातील ११ नृसिंहांपैकी मेहकरला असलेल्या सहाव्या नृसिंहासमोर दीडशे भाविकांनी या स्तोत्राचे सलगपणे ९ हजार ७१८ पाठ केल्याने लिम्का बुक आॅफ रेकॉर्डच्या प्रतिनिधीने याचा सर्व तपशील मागवून; सलग १६८ तास विष्णुसहस्त्रनामाच्या अखंड पाठाच्या विक्रमाची नोंद यापूर्वीच्या अभिलेखात नसल्यामुळे ही नोंद घेण्याचे सकारात्मक संकेत दिले. विष्णुसहस्त्रनाम हे आध्यात्मिक दृष्टीने अतिशय शक्तिशाली मानले जाणारे एकशेवीस श्लोकांचे मोठे स्तोत्र! महाभारतीय युध्दानंतर मृत्यूची प्रतिक्षा करीत शरपंजरी पडलेले असताना पितामह भीष्मांनी या दिव्य स्तोत्राची निर्मिती केली. हे स्तोत्र कंठस्थ असणारे लोक मुळात कमी आहेत. मात्र जगातील अकरा नृसिंहांपैकी मेहकरला असलेल्या सहाव्या नृसिंहासमोर या स्तोत्राचे एक सप्ताहभर रात्रंदिवस पाठ केरण्यात पठण करण्यात आले. आणि बघता बघता आध्यात्मिक इतिहासातील एक अभिनव विक्रम रचल्या गेला. मेहकरचे नृसिंह मंदिर हे जगातील अकरा नृसिंहस्थानांपैकी सहावे स्थान आहे. या प्राचीन मंदिरात हे अखंड पाठ करण्याची संतश्री बाळाभाऊ महाराज यांच्या संस्थानचे गुरुपीठाधीश अॅड. रंगनाथ महाराज पितळे यांनी प्रेरणा दिली. दीडशे भाविकांनी हा संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांच्या हाकेला प्रतिसाद दिला. दिवसभरातील चोवीस तासांमध्ये या दीडशे भाविकांची विभागणी करण्याती आली. दर तासाला एकावेळी सहा ते सात भाविकांनी सलगपणे पाठ करण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी प्रत्येकी सहा ते सात भाविकांच्या चोवीस चमू बनविण्यात आल्या. दिवसभर महिलांनी आणि रात्रभर पुरुषांनी पाठ करण्याची जबाबदारी स्वीकारली. अश्या नियोजनबद्ध आखणीमुळे नृसिंहाचा वार मानल्या जाणारा श्रावणातला तिसरा शनिवार ते चवथा शनिवार (१ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर ) या कालावधीत रात्रंदिवस सलगपणे विष्णुसहस्त्रनामाचे एकूण ९७१८ अखंड पाठ करण्याचा विक्रम प्रस्थापित झाला. ..बॉक्स....संकल्पाची सांगता८ सप्टेंबरला सकाळी श्रीमूर्तीचा रुद्राभिषेक झाल्यानंतर सर्व भाविकांनी एकाचवेळी विष्णुसहस्त्रनामाचा सामुहिक पाठ घेऊन, संत बाळाभाऊ महाराज पितळे ऊर्फ श्वासानंद माऊली यांची पारंपरिक उपासना व आरती करून या संकल्पाची सांगता करण्यात आली. यानंतर उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
विष्णुसहस्त्रनामाचे आध्यात्मिक महत्त्व आहे. या संकल्पपूर्तीसाठी भाविकांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद लाभल्यानेच आपण हे ध्येय गाठू शकलो. प्रसार भारतीचे वरीष्ठ अधिकारी सुरेश बोचरे यांनी ‘लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड’ च्या दिल्लीस्थित कार्यालयात संपर्क साधला असता त्यांच्या प्रतिनिधीने यासंदर्भातील सर्व तपशील मागवून; विष्णुसहस्त्रनामाच्या अखंड पाठाच्या विक्रमाची नोंद घेण्याचे सकारात्मक संकेत दिले आहेत.- अॅड. रंगनाथ महाराज पितळे गुरुपीठाधीश, संत बाळाभाऊ महाराज संस्थान, मेहकर.