मलकापूर पांगरा (बुलढाणा) : समृद्धी महामार्गावर दुसरबीड टोलनाका जवळ झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना २० फेब्रुवारी राेजी सकाळी ९ वाजता घडली़.
समृद्धी महामार्गावर कार क्रमांक एमएच ०४ एलबी ३१०९ मुंबईवरून अकोल्याच्या दिशेने जात हाेती़ दरम्यान चॅनेल क्रमांक ३१८.८ वर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. यामुळे कार मीडियनमधील क्रॅश बॅरिअरला धडकली आणि बॅरिअरची लोखंडी पट्टी कारच्या समोरून घुसून मागील बाजूने बाहेर पडली. यानंतर कारने पेट घेतला. या अपघातात गणेश सुभाष टेकाळे (वय ४०) आणि राजू महंतलाल जयस्वाल (वय ३२), दोघेही रा़ मुंबई यांचा जागीच मृत्यू झाला.
कारचा चालक अभिजीत अर्जुन चव्हाण (वय ३५, रा़ मुंबई) गंभीर जखमी असून, त्याला तातडीने बीबी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.अपघाताची माहिती मिळताच महामार्ग रुग्णवाहिका सेवेचे डॉ. वैभव बोराडे, डॉ. यासीन शहा, चालक दिगंबर शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच समृद्धी महामार्ग क्युआरव्ही टीम, महामार्ग पोलीस, किनगाव राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरवाडे, देऊळगाव राजा उपविभागाच्या उपविभागीय पाेलीस अधिकारी मनीषा कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील कारवाई केली. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कार हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.