लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : बुलडाणा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याच प्रमाणात कोरोना चाचणीही करण्यात येत आहे. परंतु कोरोना चाचणी करण्यात येत असलेल्या ठिकाणीच मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे १८ मार्च रोजी दिसून आले. खामगाव येथे उपजिल्हा सामान्य रूग्णालयात कोविड तपासणी केली जात आहे. त्याच वेळी कोरोना सुपर स्प्रेडरची ही तपासणी केली जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवार, बुधवार आणि गुरूवार अशी तीन दिवस तपासणी करण्यात येत आहे. परंतु शहरातील नागरिकांना कोरोना चाचणी करण्याच्या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होत असून, येथे सर्व कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांना कोरोना चाचणी करण्यासाठी तासनतास थांबण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे ज्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येतात, असेच नागरिक येथे येत आहेत.
रूग्णालयात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन नाही ! कोविड तपासणी करणाऱ्यांमध्ये अनेकांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. त्याच वेळी निगेटिव्ह अहवाल येणाऱ्यांची टक्केवारी अधिक आहे. निगेटिव्ह अहवाल येणाऱ्यांना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीपासून धोका संभवत आहे. येथे कोणत्याही प्रकारचे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. कोरोना चाचणी केली जात असलेल्या ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांच्या वतीने सुद्धा मास्कचा वापर करा, फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्याचे आवाहन केले जात आहे. परंतु काही नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचेही दिसून आले. तरी नागरिकांनीही कोरोना नियमांचे पालन करुन आपली कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.