बुलडाणा : शिक्षक पात्रता परीक्षेचा(टीईटी) निकाल जाहीर झाल्यानंतर प्रमाणपत्रांचे वितरण जिल्हास्तरावर सुरू झाले आहे. १९ जानेवारी २०२० राेजी झालेल्या टीईटी परीक्षेचा बुलडाणा जिल्ह्याचा निकाल ५.८ टक्के लागला आहे. उत्तीर्ण झालेल्या ४६३ उमेदवारांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आलेली टीईटीची परीक्षा ८ हजार १० विद्यार्थ्यांनी दिली हाेती. यामध्ये पहिला पेपर ४ हजार ५७३ विद्यार्थ्यांनी दिला हाेता. तसेच दुसऱ्या पेपरला ३ हजार ४३७ विद्यार्थी उपस्थित हाेते. या परीक्षेचा निकाल ५ ऑगस्ट २०२० राेजी जाहीर करण्यात आला हाेता. यामध्ये पेपर १ मध्ये ३१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले हाेते. दुसऱ्या पेपरमध्ये सामाजिक शास्त्रामध्ये १३३ तर विज्ञान आणि गणितमध्ये १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले हाेते. या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र नुकतेच शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहे. तसेच प्रमाणपत्रांचे वितरणही सुरू झाले आहे. आतापर्यंत १९५ प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, परीक्षेचेे प्रवेशपत्र, आधार, शैक्षणिक व्यवसायिक प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र आदींसह शिक्षण विभाग जिल्हा परिषद बुलडाणा येथे संपर्क करण्याचे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी केले आहे.
टीईटीचा निकाल ५.८ टक्के, प्रमाणपत्रांचे वितरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 5:53 AM