मलकापूर पांग्रा : गावातील रस्ते किंवा इतर समस्या मार्गी लावण्यासाठी राजकीय पुढारी किंवा युवक आंदोलन करतात, हे सर्वांनी बघितले. परंतू सिंदखेड राजा तालुक्यातील पोफळ शिवणी येथील एका ८५ वर्षीय आजीने गावातील रस्त्यासाठी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी गुरूवारी पंचायत समितीपासून मंत्रालयापर्यंत सर्वांनाच निवेदनही पाठविले आहे.
सिंदखेड राजा तालुक्यातील पोफळ शिवणी येथे राज्य शासन ग्राम विकास मंत्रालय दलित वस्ती सुधार योजनेतून मंजूर झालेला रस्ता गाव नमुना ८ अ वर असताना सुधा गावातील काही लोकांनी रस्त्याचे काम अडविले आहे. ग्रामपंचायत प्रशासन देखील रस्ता करण्यास टाळाटाळ करत आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी शासन दरबारी निवेदने देऊनही अद्यापपर्यंत हा रस्ता मोकळा झाला नाही. त्यामुळे येथील ८५ वर्षीय लक्ष्मीबाई उकंडा जाधव यांच्यासह ११ जणांनी २४ एप्रिल पासून सिंदखेड राजा पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
यासंदर्भात लक्ष्मीबाई उकंडा जाधव यांच्यासोबत नामदेव जाधव, ज्ञानेश्वर जाधव, किशोर जाधव, विलास जाधव, कैलास जाधव, सुनंदा जाधव, गजानन जाधव, श्रीकृष्ण जाधव, श्रीराम आडे, शहाजी जाधव यांनी ग्रामपंचायत पासून ते मंत्रालयापर्यंत सर्वांनाच निवेदन पाठविले आहे. एका वस्तीत जाणार रस्ता अडविण्यात आला असून हा रस्ता मोकळा करुन द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या व पदाचा गैरवापर करणारे सरपंच व पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.