बुलडाणा - वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गुप्त बैठक झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्याबाबत खुद्द प्रकाश आंबेडकरांनी खुलासा करत रात्री ही भेट झाल्याचं कबूल केले. पण त्याचसोबत प्रत्येकवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटलो म्हणजे राजकीय चर्चा झाली असं नाही. इंदू मिलमधील स्मारकाबाबत बैठकीत चर्चा झाली. आमची आघाडी आजही ठाकरेंसोबत कायम आहे, असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टही केले. यावरुन, आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. त्यातच शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांना प्रकाश आंबेडकरांना उद्देशून विधान केलं आहे.
मुख्यमत्री शिंदेंनी कोणाला सोडावं आणि कोणाला पकडावं हे बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगण्याची काही गरज नाही. जगाच्या इतिहासात सर्वात मोठा निर्णय घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील बंडखोरीच समर्थन केलं. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सिंदखेडराजा येथे ते आले होते, यावेळी त्यांना माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
आगामी निवडणुका शिवसेना ठाकरेंसोबत लढवायच्या आहेत, यात कुठेही बदल झाला नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. तसेच ज्या पक्षासोबत भाजपा त्यांच्यासोबत वंचित बहुजन जात नाही. भाजपासोबत वैचारिक लढाई आहे. भाजपाच्या मित्रपक्षासोबतही कधीच समझौता नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलो होते, त्यावरुन गुलाबराव पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर दिलंय.
जिजाऊ विकास आराखड्याबद्दलही सांगितलं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अधिकार खूप मोठा आहे. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विकास आराखड्याबद्दल सगळ्यांना कल्पना आहे. शासन त्याबाबत कटीबध्द आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सिंदखेडमध्ये विकास होणार असल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटले. तसेच आमदार अमोल मिटकरी यांनी आमदार बच्चू कडू यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य हास्यास्पद आहे, असेही ते म्हणाले.