बुलडाणा: बुलढाणा शहरातील शांतीनगरच्या मागील खोऱ्यात ८ मे रोजी बिबट्याचा कुजलेला मृतदेह आढळून आलेला असतानाच, आता तालुक्यातील चौथा शिवारात एक मादी बिबट मृतावस्थेत आढळून आले. पाडळी येथील रहिवासी अभिमन्यू भगवान डुकरे यांची चौथा शिवारातील गट क्र. 64 मध्ये शेती आहे. या ठिकाणी २९ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास एक बिबट मुतावस्थेत असल्याची माहिती बुलढाणा वनविभागाला मिळाली. बुलढाण्याचे आरएफअेा अभिजित ठाकरे व इतर कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले व मृत बिबट्याचा पंचनामा केला.
मृत मादी बिबटाचे वय साधारणत: चार वर्षाचे आहे. पाडळी येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. डी. एस. मोरे यांनी घटनास्थलीच मृत मादी बिबट्याचे शवविच्छेदन केले. सोबतच त्याच ठिकाणी बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तीन ते चार दिवसा अगोदर या बिबट्याचा मृत्यू झाला असावा असा कयास आहे. मृत मादी बिबटाची नखे, मिश्या, दात व इतर अवयव शाबूत असल्यामुळे हा शिकारीचा प्रकार नसल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती आरएफओ अभिजीत ठाकरे यानी दिली.