नीलेश जोशी, डोमरूळ (जि. बुलढाणा): रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्परच्या मागे जालना जिल्ह्यातील महसूल विभागाचे पथक लागल्याने त्यापासून सुटका करण्यासाठी टिप्पर चालाकने टिप्पर शुक्रवारी पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीत डोमरूळ गावात घातले. गावातील अरुंद रस्त्यामुळे भरधाव वेगातील या टिप्परने गावातील तीन ते चार जणांच्या घराच्या भिंती पाडल्या तर चार दुचाकींचा चुराडा केला.
सुदैवाने एका गल्लीत रस्त्यावर गिट्टी टाकलेली असल्याने तेथून टिप्पर बाहेर काढता आले नाही. अन्यथा जिवीत हानी होण्याची भिती होती. पहाटे झालेल्या या थरारामुळे साखर झोपेत असलेले ग्रामस्थ मात्र खडबून जागे झाले. बुलढाणा तालालुक्यातील मराठवाड्याच्या सिमेवर असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील टाकळी या सुमारे ५०० लोकसंख्या असलेल्या गावात १ सप्टेंबरच्या पहाटे हा प्रकार घडला. दरम्यान या गंभीर प्रकारावरून मराठवाडा काय किंवा बुलढाणा जिल्हा काय रेतीमाफियांनी किती उच्छाद मांडला आहे, याची कल्पना यावी.
असा आहे घटनाक्रम
३१ ऑगस्ट रोजी मध्यरात्री जालना व बुलढाणा जिल्ह्याच्या सिमावर्ती भागात रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्परचा जालना जिल्ह्यातील महसूलचे एक पथक पाठलाग करत होते. त्याची चाहूल लागल्याने टिप्पर चालकाने भरधाव वेगात टिप्पर हे बुलडाणा जिल्ह्याच्या हद्दीत घातले. जांब नजीक बुलढाण्याच्या हद्दीत हे टिप्पर आले. महसलूचे पथक त्याचा पाठलाग करतच होते. दरम्यान या सर्व प्रकाराने अधिकच धांदल उडालेल्या टिप्पर चालकाने हे धाड नजीक टाकळी गावात टिप्पर घातले. पाठलाग होत असल्याने भरधाव वेगात गावातील चिंचोळ्या गल्लीतून टिप्पर धावत होते. या दरम्यान चार ते पाच जणांच्या घरांच्या भिंतीला टिप्पर धडकल्याने या घराच्या भिंतींचे नुकसान झाले आहे. सोबतच घरासमोर उभ्या करण्यात आलेल्या चार दुचाकींचाही चुराडा झाला. दत्ता जगताप, रामदास जगताप, प्रमोद दांडगे, आकाश पांडेंच्या दुचाकींचे नुकसान झाले.
चालक-वाहकाला केले पोलिसांच्या स्वाधीन
या टिप्परवरील चालक, वाहकाला टाकळी गावातील नागरिकांनी पहाटेच पकडून महसूल पथकाच्या सहकार्याने धाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. चालक व वाहक पळून जाण्याच्या बेतात असतांना त्यांना ग्रामस्थांनी पकडले. रेतीची अवैध वाहतूक करणारा टिप्पर हा जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी येथील असल्याची माहिती आहे. दरम्यान धाडचे प्रभारी ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी टिप्परवरील संबंधीत दोघांना जाफ्राबाद पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे सांगितले.
ग्रामस्थांनी टिप्पर धरले अडवून
पहाटेदरम्यानच्या या थरारानंतर ज्या ग्रामस्थांचे टिप्परमुळे नुकसान झाले त्यांनी नुकसान भरपाईची मागणी करत टिप्पर अडवून धरलेला आहे. सोबतच याप्रकरणी ग्रामस्थ धाड पोलिस ठाण्यात तक्रार देण्याच्या तयारीत आहेत.
पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमाराचीही घटना टाकळी गावाला खडबडून जागे करून केली. गावात एक मोठा अनर्थ टळला. गाव विदर्भ -मराठवाड्या सिमेवर आहे. त्यामुळे अशा वाहनांचा नेहमीच त्रास असतो. विदर्भ-मराठवाड्याच्या सिमेवर सवंगी येथे पोलिस चौकी उभारल्यास अशा घटनांना आळा बसू शकतो.-गणेश तायडे,उप सरपंच डोमरूळ टाकळी