बुलढाणा : वनसंरक्षण प्राप्त असलेल्या घाेरपडीची शिकार करून विक्री करणाऱ्या एका वनविभागाच्या पथकाने मेरा फाटा येथे अटक केली़ ही कारवाई १६ सप्टेंबर राेजी करण्यात आली.
बुलढाणा वनपरिक्षेत्र अंतर्गतच्या मेरा फाटा येथे एक व्यक्ती घोरपड विकत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली़ या माहितीच्या आधारे बुलढाणा आरएफओ अभिजित ठाकरे यांनी एक पथक १६ सप्टेंबर रोजी रवाना केले. या पथकाने जाऊन चौकशी केली असता एक व्यक्ती नायलॉनची थैलीमध्ये असलेली घोरपड पंधराशे रुपयात विकत असल्याचे निदर्शनास आले़. या पथकाने त्याला ताब्यात घेऊन बुलढाणा वन परिक्षेत्र कार्यालयात आणले. याप्रकरणी आरोपी राजेंद्र तुकाराम शिंदे (रा. शेंदुर्जन, ता. सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा) याच्याविरुद्ध वन संरक्षण अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कार्यवाही उपवनसंरक्षक कुमार स्वामी यांच्या मार्गदर्शनात तसेच बुलढाणा आरएफओ अभिजित ठाकरे यांच्या नेतृत्वात वनपाल मोहसिन खान, वनरक्षक हबीब पठान, दीपक घोरपड़े, समाधान झोटे, भूषण जाधव, ज्ञानेश्वर भोसले, सर्वदा कराट यांनी केली आहे. रानडुक्कर, हरीण, नीलगाय, घोरपड, तितर, बटेर यासारख्या वन्य प्राणी-पक्षी यांची शिकार करू नये, असे आवाहन आरएफओ अभिजित ठाकरे यांनी केले आहे.