खामगाव: तालुक्यातील हिवरा बु. गट ग्रामपंचायतीतील बेलुरा येथे रस्त्यासाठी विद्यार्थी आणि युवकांनी गत तीन दिवसांपासून उपविभागीय अधिकारी कार्यलयासमोर बेमुदत उपोषणास प्रारंभ केला आहे. वाढत्या उकाड्यामुळे उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने, उपोषण कर्त्यांची तातडीने वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. बुधवारी सर्वच ११ उपोषण कर्त्यांचे वजन मोजण्यात आले. शिवाय रक्तगट चाचणीही करण्यात आली.
खामगाव तालुक्यातील बेलुरा येथे रस्त्यासाठी वेळोवेळी ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकार्यांना निवेदन सादर केले. ०१ नोव्हेंबर २०२२ रोजीही निवेदनातून बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला. मात्र, तरीही प्रशासकीय स्तरावरून निवेदनाची दखल घेण्यात आली नाही. त्यानंतर बेलुरा येथील विद्यार्थी व युवकांनी ०५ जून पासून बेमुदत उपोषणाला सुरूवात केली.
किशोर वाकोडे, अभिजीत इंगळे, संदेश वानखडे, अर्पित वाकोडे, सतीश इंगळे, भारत वाकोडे, सुरज इंगळे, सुरज तेलंग, शुभम इंगळे, शरद इंगळे, किर्तीरत्न वाकाेडे हे उपोषणाला बसले आहेत. विद्यार्थी आणि युवकांच्या या बेमुदत उपोषणाला समाजातील सर्वच स्तरातून पाठींबा मिळत आहे. बुधवारी उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत असल्याने वैद्यकीय तपासणी करण्यात आली. शासकीय रूग्णालयातील तज्ज्ञांनी तसेच डॉक्टरांनी पोलीसांच्या मदतीने उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणी केली.
प्रशासकीय स्तरावरून बोळवण
गत वर्षभरापासून सातत्याने बेलुरा येथील ग्रामस्थांकडून रस्त्यासाठी वेळोवेळी निवेदन, आंदोलन करण्यात आले. मात्र, प्रशासकीय स्तरावरून या आंदोलन कर्त्यांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केल्या जात आहे. प्रशासकीय स्तरावरून कोणताही तोडगा निघत नसल्याने बेलुरा ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मागणी मान्यहोईपर्यंत बेमुदत उपोषणाचा विद्यार्थ्यांचा निर्धार असल्याची चर्चा आहे.