बुलढाणा : स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ‘करो-मरो’चा नारा देत २७ डिसेंबरपासून नागपूर येथे ॲड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाच्या समर्थनार्थ बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ‘आमरण उपोषण’ सुरू केले. गारठ्यात सुरू असलेल्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असून जिल्हाध्यक्षांना रक्तदाबाचा, तर युवा प्रदेशध्यक्षांना भोवळीचा त्रास जाणवत आहे.
उपोषणकर्त्या आंदोलकांकडे जिल्हा प्रशासनाद्वारे दुर्लक्ष केले जात आहे. जिल्हाध्यक्ष सुरेश वानखेडे, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष मुकेश मासुरकर, जय विदर्भ पार्टी बुलढाणा अध्यक्ष प्रा. राम बारोटे, समन्वयक तेजराव मुंडे, जनार्दन इंगळे, रविकांत आढाव, राजेंद्र पवार, आत्माराम गाढे हे २७ डिसेंबरपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. उपोषणाच्या माध्यमातून विजेची दरवाढ राज्य सरकारने तत्काळ मागे घ्यावी व शेतीपंपाला दिवसाचे लोडशेडिंग बंद करावे, विदर्भात येऊ घातलेले दोन्ही औष्णिक वीज प्रकल्प विदर्भाबाहेर न्यावेत, विदर्भ वैधानिक विकास मंडळ नको, विदर्भ राज्यच हवे आदींसह इतर मागण्या करण्यात येत आहेत. यावेळी उपोषणास दामोदर शर्मा, प्रा. रामदास शिंगणे, ॲड. दीपक मापारी, रंजित डोसे पाटील, शिवाजी देशमुख, दयानंद मिसाळकर, जयंत जाधव, मो. सादिक सत्तार देशमुख, दीपक रिंढे, प्रा. रमेश इंगळे, ॲड. सुभाष विणकर, मुरली महाराज येवले, देविदास कणखर, बापू लंबे, श्रीकांत मोरे, शाहीर प्रमोद दांडगे, सुदाम हिवाळे, ज्ञानदेव रत्नपारखी, पुरुषोत्तम दांडगे, अरुण गिरी, मुन्ना बेंडवाल, रेखा खरात, शेख इरफान, सतीश वानखेडे, रेखा वानखेडे, प्रल्हाद राहाटे, रेखा राहाटे, अशोक घोंगटे, बाबुराव बारोटेसह अनेक विदर्भवादी उपस्थित होते.