अंढेरा : सिंदखेडराजा मतदारसंघातील विविध मागण्या व शासकीय योजनांमधील गैरप्रकाराच्या विरोधात २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या दिवसांपासून वेगवेगळ्या तीन ठिकाणी उपोषण सुरू करण्यात आले आहेत. मात्र अद्यापही विविध मागण्यांसाठी तीन ठिकाणी सुरू असलेले उपोषण प्रशासनाकडून बेदखल आहेत.
देऊळगाव राजा येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल चित्ते व विकास गवई यांनी २ ऑक्टोबरपासून संत चोखासागरातील बेटावर बसून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. अवैध रेती उत्खननास जबाबदार असलेले तहसीलदार श्याम धनमने यांच्यावर विभागीय आयुक्तांनी नेमलेल्या चौकशी अहवालानुसार दोषी आढळलेले तहसीलदार यांना तत्काळ निलंबित करावे, या मागणीसाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख अनिल चित्ते व विकास गवई यांनी संत चोखामेळा धरणाच्या मध्यभागी असलेल्या बेटावर २ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
देऊळगाव मही येथे महामार्गानजीक असलेल्या राम मंदिराजवळ आपल्या शोषित व पीडित जनतेसाठी उपोषणाला देऊळगाव मही येथील रामदास पाटीलबा शिंगणे व शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस रामेश्वर वायाळ यांनी पक्षाच्या वतीने एकूण ११ मागण्यांसाठी निवेदन शासनाला दिले. मलकापूर सोलापूर महामार्गावरील देऊळगाव मही येथील ३०० मीटर अंतरात वाहने हळू चालवा, सर्वच शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण न करता जमीन भूसंपादन करून शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देण्यात यावा, तसेच राहिलेले अपूर्ण काम पूर्ण करावे, अपघात होऊ नये म्हणून शेतकऱ्यांना विश्वासात मूळ जुना रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी रामदास पाटीलबा शिंगणे व शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस रामेश्वर वायाळ हे उपोषण करीत आहेत.
आतापर्यंत या उपोषणाला माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संघटक प्रा. सदानंद माळी, तोताराम कायंदे, विनोद वाघ, नरेंद्र खेडेकर, धनशिराम शिंपणे, संतोष भुतेकर यांनी भेटी दिल्या असून प्रशासनाकडून मात्र हे उपोषणे पूर्णपणे दुर्लक्षित आहे. त्यानंतर तिसरे उपोषण सिंदखेडराजा तालुक्यात झालेल्या विविध शासकीय व शेती उपयुक्त साहित्य सामग्री व इतर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनामध्ये झालेल्या गैरव्यवहाराच्या चौकशी व कारवाईच्या मागणीसाठी आझाद मैदान मुंबई येथे सुरू आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील शासकीय योजनेतील गैरव्यवहाराच्या विरोधात चंद्रकांत खरात हे उपोषण करत आहेत, मात्र याकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे.