वडगाव गड : जळगाव जामोद वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या वडगाव गड येथे मागील एक महिन्यापासून एका चवताळलेल्या माकडाने हैदोस घालत अनेकांना चावा घेतला होता. या माकडाला जेरबंद करण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सोमवारी यश आले.माकडाच्या हल्ल्यात वडगाव गड येथील दोन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली होती. त्यांच्यावर बुलढाणा व अकोला येथे उपचार करण्यात आले. यानंतर शनिवारी दुपारी सत्यविजय वनारे यांच्यावर अचानक या माकडाने जीवघेणा हल्ला केला होता. तर, या माकडाला पकडण्यासाठी तीन दिवसांपासून वनविभागाच्या वतीने मोहीम राबविण्यात आली. रविवारी एक माकड जेरबंद करण्यात आले होते. परंतु, उपद्रवी माकड मोकळे असल्याने दोन ते तीन गावकऱ्यांवर हल्ला करण्याच्या दृष्टीने अंगावर चालून आले होते. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतकरी शेतात जाण्यास घाबरत होते.
सोमवारी सकाळीसुद्धा हे माकड काहींच्या अंगावर चालून गेले असता जळगाव वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळपासून या माकडाला पकडण्यासाठी परिश्रम घेतले. अखेर दुपारी श्रीराम मंदिरासमोर वडाच्या झाडावर हे माकड थांबले असता बेशुद्ध करून पकडण्यात आले. यामुळे गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.