खामगाव - काही वेळा आपलाच आपल्या कानावर विश्वास बसत नाही, अशाही काही घटना आपल्या ऐकायला मिळतात. खामगावात देखील ‘ऐकावं ते नवलच’ या म्हणीचा प्रत्यय देणारी घटना गुरूवारी उघडकीस आली. चोरीला गेलेल्या मोटारसायकलीचा छडा लावण्यासाठी पोलीसांनी चक्क चोरट्यालाच एक हजार रुपयांची लाच दिली. चोरी गेलेल्या मोटार सायकलीचे ‘लोकेशन’मिळाल्यानंतर पोलीसांनी चोरट्याला जाळ्यात अडकविले.
खामगाव शहरातील जिया कॉलनीतील शेख राजीक यांच्या मालकीची एमएच २८ डब्ल्यू २३१८ बुधवारी रात्री चोरीला गेली. या घटनेची माहिती त्यांनी शहर पोलीसस्टेशनच्या डीबी पथकाला दिली. घटनेची माहिती मिळताच संशयीताला ताब्यात घेतले. त्याने सुरूवातीला ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेतली. नंतर, एक हजार रुपये दिल्यास आपण चोरीला गेलेल्या मोटार सायकलीचे ‘लोकेशन’ सांगू अशी हमी त्याने पोलीसांना दिली. पोलीसांनी मोटार सायकल मालकाच्या समोरच चोरट्याची ‘डीमांड’पूर्ण केली. त्यानंतर पोलीस त्याला मोटार सायकलवर बसवून घटनास्थळी घेऊन गेले. चोरी गेलेल्या मोटार सायकलची खात्री पटल्यानंतर काही वेळातच पोलीसांनी चारचाकी वाहन बोलावून चोरट्याला जाळ्यात ओढले.
तत्पूर्वी, पोलिसांनी ‘समिर’ला दिलेले हजार रुपयेही त्याच्या खिशातून काढून घेतले. चोरी गेलेली मोटार सायकल शहर पोलिस स्टेशनला जमा केली आहे. याप्रकरणी पुढील कारवाई शहर पोलिस करीत आहेत.
बॅटरीसह काही स्पेअरपार्ट विकले!- चोरट्याने मोटारसायकल चोरी केल्यानंतर मोटारसायकलीची बॅटरी आणि किरकोळ स्पेअर पार्टची तात्काळ विक्री केली. मात्र, थोडक्यात बचावलो म्हणत मोटार सायकलच्या मालकाने सुटकेचा श्वास सोडला.
फोटो: शहर पोलीस स्टेशनमध्ये लावण्यात आलेली मोटार सायकल.