संदीप वानखडे, बुलढाणा: जिल्हाभरात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननाच्या विराेधात जिल्हाधिकारी डाॅ. किरण पाटील यांच्या नेतृत्वात महसूल विभागाने कारवाई सुरू केली आहे. विविध पथकांनी दाेन दिवसांत २ हजार २०० ब्रास अवैध वाळू जप्त करण्यात आली आहे, तसेच या वाळूचा शासकीय कामे, तसेच घरकुल किंवा अन्य कामासाठी आवश्यक असलेल्यांना जागीच लिलाव करून देण्यात आली आहे. अवैध उत्खननाविषयी ‘लाेकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्याची दखल घेत महसूल विभागाने कारवाईचा धडाका सुरू करीत विशेष माेहीम सुरू केली आहे.
महसूल विभागाने गेल्या दोन दिवसांत केलेल्या कारवाईत डिग्रस बु. येथील ५०० ब्रास, निमगाव वायाळ येथे एक हजार ब्रास आणि नारायण खेड येथे ७०० ब्रास, अशी एकूण २०० ब्रास अवैध वाळू जप्त केली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, महसूल प्रशासन, परिवहन विभाग आणि पोलिस प्रशासन यांनी २३ मे रोजी संयुक्त मोहिमेदरम्यान वाहनांवर कारवाई करण्यात केली. यात १२ टिप्पर, दोन ट्रॅक्टर, एक कार आणि चार इतर वाहने, अशा एकूण १९ वाहनांवर कारवाई करण्यात आली. यात दोन लाख १८ हजार रुपयांच्या दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. या कारवाईत सहायक मोटर वाहन निरीक्षक रितेश चौधरी, सुरेखा सपकाळ, अनुजा काळमेघ यांनी सहभाग नोंदविला.जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी चिंचखेड येथील खडकपूर्णा धरणाला भेट दिली. यावेळी त्यांनी बोटी उद्ध्वस्त करण्यात आलेल्या ठिकाणी भेट दिली, तसेच या भागातील रेतीसाठा जप्त करण्याच्या सूचना दिल्या.