खामगाव: शहरातील गजबजलेल्या ठिकाणाहून दुचाकीच्या डीक्कीतून चोरी गेलेल्या सहा लाख रूपयांच्या रक्कमेचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी छडा लावला. त्यानंतर आरोपींकडून हस्तगत केलेल्या रक्कमेचा धनादेश शुक्रवारी शहर पोलीसांनी संबधितांना सुपूर्द केला.
खामगाव येथील अडत दुकानदार श्याम बजरंग गायकवाड यांच्या दुचाकीच्या िडक्कीतून अज्ञात चोरट्यानी १६ मार्च रोजी सहा लाख रुपयांच्या रक्कमेची चोरी केली. नास्ता करण्यासाठी काही मिनीटे गाडी उभी केल्यानंतर क्षर्णाधात चोरट्यांनी ही रक्कम उडविली होती. शहरातील अतिशय गजबजलेल्या ठिकाणाहून पैसे चोरी गेल्याने, अडत दुकानदार बजरंग गायकवाड यांचे जवळचे नातेवाईक प्रमोद मोठे यांच्यावरही संशय घेतल्या जात होता.
दरम्यान, याप्रकरणी तक्रारीवरून शहर पोलीसांनी भादंिवच्या विविध कलमान्वये अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि शहर पोलिसांनी दोन दिवसांत गुन्ह्याचा छडा लावला. गुजरात येथील अहमदाबाद येथून ०९ जणांच्या टोळीना जेरबंद केले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यामुळे त्यांच्याकडून सहा लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. आरोपींकडून हस्तगत केलेल्या रक्कमेचा धनादेश गुरूवारी शहर पोलीस स्टेशनचे निरिक्षक शांतीकुमार पाटील यांनी श्याम गायकवाड यांच्या सुपूर्द केला. चोरी गेलेली मोठी रक्कम पोलीसांच्या सतर्कतेने परत मिळाली.
या रक्कमेचा धनादेश मिळताच श्याम गायकवाड यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. जिल्हा पोलीस अधिक्षक सारंग आवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक लांडे, अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलीसांनी चोरी गेलेल्या रक्कमेचा छडा लावला. गुप्त माहिती आणि काही धागेदोर्यांच्या आधारे मोठी आणि प्लॅन करून करण्यात आलेल्या चोरीचा पोलीसांनी छडा लावल्याने, पोलिसांचे समाजमनात कौतुक केले जात आहे.