सिंदखेड राजा - समृद्धी महामार्गावर पिंपळखुटा फाट्यावर झालेल्या खासगी बसच्या अपघातात २५ प्रवाशांचा जळून मृत्यू झाला हाेता. मृतदेहांचा काेळसा झाल्याने ओळख पटविण्याचे आव्हान प्रशासनासमाेर हाेते. अपघातातील मृतकांच्या नातेवाइकांचे रक्तनमुने घेऊन डीएनए अहवालावरून ओळख पटविण्यात आली आहे. याविषयीचा अहवाल सिंदखेड राजा पाेलिसांना २५ दिवसांनंतर मिळाला आहे.
समृद्धी महामार्गावरील पिंपळखुटा फाट्यावर विदर्भ ट्रॅव्हलच्या खासगी बसचा १ जुलै राेजी अपघात झाला हाेता. यामध्ये २५ प्रवाशांचा जळाल्याने मृत्यू झाला हाेता. या दुर्घटनेतील मृतकांच्या नातेवाइकांचे रक्त नमुने घेऊन ओळख पटविण्याचे माेठे आव्हान प्रशासनासमाेर हाेते. अपघातानंतर पुढील दोन दिवसांत २४ नातेवाइकांचे रक्त नमुने अमरावती येथे फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आले होते. एका महिलेची त्याचवेळी ओळख पटल्याने २४ मृतकांच्या नातेवाइकांचे रक्त नमुने घेण्यात आले. या अहवालातून सर्वांची ओळख पटली असून, मृतकांच्या नातेवाइकांना इन्शुरन्स क्लेम करणे व अन्य सरकारी लाभ मिळविणे यामुळे सोपे जाणार आहे.
बस चालक अजूनही कोठडीत
अपघातग्रस्त खासगी चालक शेख दानिश शेख इजराईल हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. घटनेचा पोलिस तपास सुरू असून, प्राथमिक स्तरावर चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचे निष्पन्न झाले आहे. चालक शेख दानिश याला ४ जुलैपर्यंत पोलिस कोठडी मिळाली होती. ५ जुलैला त्याला न्यायालयासमोर हजर केले. आता त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.