लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज बांधवांकडून राज्यभरात आंदोलने सुरूच असून शनिवारीही ठिकठिकाणी आंदोलनाची धग कायम होती. हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा येथील स्मशानभूमीत तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरू होते. परभणी तालुक्यातील मांडाखळी येथे मुंडन आंदोलन तर इतर ठिकाणी लाक्षणिक उपोषण होते. बुलढाणा जिल्ह्यातही काही भागात समाजबांधवांनी ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली.
महिलेचे उपोषण, तरुणांनी केले मुंडण आरक्षणाच्या मागणीसाठी बार्शी तालुक्यातील सासुरे (जि. सोलापूर) येथील वैशाली आवारे यांनी गावातच उपोषण सुरू केले आहे. तर घाणेगाव येथे तरूणांनी मुंडण आंदोलन केले.
शाळा, महाविद्यालये बंद लातूर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शनिवारी पुकारण्यात आलेल्या बंदला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाळा, महाविद्यालये व शिकवणी वर्गातही दिवसभर शुकशुकाट होता.
ग्रामसभा घेऊन सर्वानुमते ठराव धाराशिव : तालुक्यातील मेडसिंगा गावात झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्याचे निश्चित करतानाच यापुढे राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा ठराव घेण्यात आला. आरक्षण मिळेपर्यंत ही गावबंदी कायम राहणार आहे.
ठाणे बंदची हाकसकल मराठा मोर्चाच्या वतीने सोमवारी ठाणे बंद पुकारला आहे. या संदर्भात ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात बैठक घेऊन एकमताने घेण्यात आला.