खामगाव : चौघांनी संगनमत करून एका २५ वर्षीय युवकांच्या तोंडात उंदीर मारण्याचे औषध कोंबले. प्रकृती अत्यवस्थ झाल्याने प्रदीप वानखडे याचा अखेर अकोला येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे युवकाच्या गावात गुरुवारी चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असून गावात तणावपूर्ण शांतता असल्याचे समजते.
तालुक्यातील एका गावातील प्रदीप प्रकाश वानखडे या युवकाच्या विरोधात काही दिवसांपूर्वीच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा मागे घेण्यासाठी पीडित युवकाला पैशांची मागणी करण्यात आली. युवकाने मागणी पूर्ण करण्यास विरोध करताच दोन युवती, एक महिला आणि एक युवक असे चौघेजण सोमवारी रात्री त्याच्या घरी गेले. जबरदस्तीने त्याच्या तोडांत उंदीर मारण्याचे पेस्ट कोंबले.
घटनेनंतर नातेवाइकांनी त्याला सोमवारी रात्री सामान्य रुग्णालयात हलविले. मात्र, प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्याला अकोला येथे हलविण्यात आले. गुरुवारी सकाळी ११:३० वाजता या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी अत्यवस्थ युवकाच्या तोंडी जबाबावरून हिवरखेड पोलिसांनी एका युवकासह दोन युवती आणि एका महिलेविरोधात कलम ३०७, ३४ अन्वये बुधवारी रात्रीच गुन्हा दाखल केला आहे. आता या घटनेत युवकाचा मृत्यू झाल्याने हा गुन्हा खुनाच्या गुन्ह्यात वर्ग केला जाईल.
चोख पोलिस बंदोबस्तविनयभंगाचा दाखल गुन्हा मागे घेण्यासाठी पैशांची मागणी करीत युवकाच्या हत्येचा प्रयत्न झाला. विषारी औषध तोंडात कोंबल्याने युवकाचा मृत्यू झाल्याचे समोर येताच, गुरुवारी दुपारपासूनच युवकाच्या गावात पोलिस तैनात आहेत. खामगाव शहर, ग्रामीण आणि शिवाजी नगर पोलिसांची एक तुकडी येथे बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण शांतता आहे. त्यानंतर त्याच्या पार्थिवावर चोख पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती आहे.