देऊळगाव राजा : तालुक्यातील खडकपूर्णा प्रकल्पाच्या धरण क्षेत्रातील विद्युत ट्रांस्फाॅर्मरमधील साडेसहा लाख रुपयांचे विविध साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना १४ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी देऊळगाव राजा पाेलिसांनी अज्ञात चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील टाकरखेड भागीले येथे खडक पूर्णा प्रकल्प क्षेत्रात आधुनिक मशिनरीसह इलेक्ट्रॉनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यामध्ये विद्युत ट्रांस्फाॅर्मरच्या कार्यालयात मशिनरीमध्ये कोअर ऑईल १९८० किलो, ३५ टक्के तांबे असलेले अंदाजे ६९३ किलोचे साहित्य, त्याची किंमत अंदाजे अडीच लाख रुपये, सोबतच तेथील ऑईल अंदाजे ८०० लिटर (किंमत ७२ हजार रुपये), त्याच ठिकाणी कार्यान्वित असलेल्या दुसऱ्या मशिनरीमधील कॉईल २५० किलो, यामध्ये ३५ टक्के तांबे असल्याने अंदाजे ९० किलो तांबे (किंमत ३० हजार), तसेच आणखी एका मशिनरीचे ऑईल २०० लिटर अंदाजे (किंमत १८ हजार) असा एकूण सहा लाख ४२ हजार रुपये किमतीचा ऐवज, तसेच ट्रांस्फाॅर्मरमधील लॅमिनेशन तोडून तांब्याची तार होईल असे साहित्य अज्ञात चोरट्याने लंपास केले आहे.
या चोरीची फिर्याद प्रोजेक्ट इंजिनिअर अभिराज सुशीलकुमार जैन यांनी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण खाडे करीत आहेत.