जानेेफळ: घरातील सर्व मंडळी बाहेरगावी गेलेले असल्याची संधी साधून दोन घरांच्या दरवाजाचे कोंडे तोडत अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळूून ७४ हजार २४९ रुपयांचा माल लंपास करण्यात आल्याची घटना जानेफळ येथे ११ एप्रिल रोजी घडली.
येथील हनुमाननगरमधील रहिवासी असलेले संदीप विठ्ठलराव अजगर व श्रीहरी रामराव रोडगे यांचे शेजारीच घरे आहेत. दोघांचेही कुटुंब बाहेरगावी गेलेल्याची संधी साधत त्यांच्या घराच्या दरवाजाचे कोंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून संदीप विठ्ठलराव अजगर यांच्या घरातील लाकडी कपाटाच्या लॉकरमधील सोन्याचे लॉकेट, चेन व इतर दागिने असा एकूण ११ ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत ४७ हजार ८३० रुपये, अंगठी किंमत २३ हजार रुपये व इतर साहित्य असा एकूण ७४ हजार २४९ रुपयांचा माल लंपास केला आहे. तसेच श्रीहरी रामराव रोडगे यांच्या घरातील लोखंडी कपाटातील कपडे व इतर साहित्य उचकटून नगदी २५०० रुपये लंपास केले आहेत.
संदीप अजगर व श्रीहरी रोडगे यांचे कुटुंबीय रविवारी सकाळी घरी परत आल्यानंतर सदर चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादी संदीप विठ्ठलराव अजगर यांनी तक्रार दिल्यावरून जानेफळ पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ठाणेदार राहुल गोंधे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार ईशाद पटेल हे करीत आहेत.