बुलढाणा : सुशिक्षीत व सुसंस्कृत अशी ओळख असलेल्या बुलढाणा शहरात अवैधधंदे वाढले असून शहरात खुलेआम गांज्याची विक्री होत असून गल्ली बोळात वरली-मटक्याची दुकाने थाटली गेली आहे. आठ दिवसात हे सर्व प्रकार थांबले नाही तर थेट बुलढाणा पोलिस ठाण्यासमोरच मंडप टाकून वरली मटक्याचे दुकान थाटून जिल्ह्यात सुरू असलेले सर्व अवैध धंदे तेथे बसून करू, असा इशारा अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार धिरज लिंगाडे यांनी दिला आहे.
२८ सप्टेंबर रोजी त्यांच्या संपर्क कार्यालयामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हा इशारा दिला. गेल्या एक वर्षात शहरात गुंडागर्दी वाढल्याचा आरोपही त्यांनी केला. काँग्रसेचे जिल्हाध्यक्ष राहूल बोंद्रे, प्रदेश सचिव जयश्री शेळके यांच्यासाबेत महाविकास आघाडीमधील शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेश शेळके, सुनील सपकाळ व अन्य उपस्थित होते.
सुसंस्कृत बुलढाणा शहरात आज जागोजागी गांजाची विक्री होत असून तरुणाई व्यसनाधिनतेच्या गर्तेत अडकत आहे. पोलिसांच्या डोळ्या देखत हा संपूर्ण प्रकार होत असून त्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगत डॉक्टर लाईन, जुनी विहीर, बाजार समिती परिसर, कारागृहाच्या मागे, क्रीडा संकुल लगत, चिखली रोडवर सर्रास पणे गांजा पिणाऱ्यांच्या टोळ्या बसलेल्या आहेत. त्यांना नेमके कोण गांजा पुरवते बुलढाण्यात गांजा येथे कुठून असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
वरली मटक्याबाबतही ही स्थिती बुलढाण्यात असून गल्ली बोळात सुरू असलेली मटक्याच्या दुकानांची नावेच त्यांनी सांगत यासंदर्भातील पुरावेही असल्याचे अधोरेखीत केले. पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असून वरिष्ठांच्या मर्जीसह या बाबी होत नसल्याचेही ते म्हणाले. अशा धंद्याच्या माध्यमातून काही ठरावीक मंडळी पैसा कमावत असल्याचेही आ. लिंगाडे म्हणाले. यासंदर्भात पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांना निवेदन दिले असले तरी आम्ही थेट पोलिस ठाण्यासमोरच वरली मटक्याचे मंडपात दुकान थाटून आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. वरच्यांच्या मर्जीशिवाय हे शक्य नसल्याचे ते म्हणाले.
दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात हीच स्थिती असल्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहूल बोंद्रेही म्हणाले. ऑनलाईन गेम्स संदर्भातही त्यांनी माहिती देत याच्या नादी लागून युवा वर्ग आत्महत्येचा मार्ग पत्करत असल्याचे सांगितले. तीन प्रकरणामध्ये शेतकरी कुटूंबातील व्यक्तींना ३० ते ४० लाख रुपये मुलाचा जीव वाचविण्यासाठी भरल्याचे सांगितले.