सिंदखेडराजा : स्वराज्याची प्रेरणा राष्ट्रमाता जिजाऊ जन्मस्थळ असलेला लखुजीराव जाधव यांचा राजवाडा कोरोना काळात बंद होता. दरम्यान, कोविडचे नियम शिथिल झाल्यानंतर राज्यातील अनेक गडकिल्ले खुले करण्यात आले. मात्र, राजवाडा आजही बंद असल्याने येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत आहे.
राजवाडा उघडावा यासाठी नगराध्यक्ष सतीश तायडे यांनी मध्यंतरी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्यावर आजतागायत कोणतीच कार्यवाही झाली नाही. मंगळवारी सिंदखेडराजा विकास आराखड्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात एक उच्चस्तरीय बैठक झाली. याच बैठकीत नगराध्यक्ष तायडे यांनी राजवाडा उघडला जावा अशी आग्रही मागणी केली. याला प्रतिसाद देत उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत उपस्थित असलेल्या पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना राजवाडा बुधवारीच उघडण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, बुधवारी दुपारपर्यंत राजवाडा उघडला गेला नाही. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी आपल्याकडे वरिष्ठांचे लेखी आदेश नसल्याची सबब देऊन उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेला एक प्रकारे केराची टोपली दाखविली आहे. बैठकीत दिलेल्या शब्दावरून पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्याने घूमजाव केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आता प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे वरिष्ठांचे लेखी आदेश कोण आणि कधी घेतले जाणार आणि प्रत्यक्ष राजवाडा कधी उघडला जाणार. राजवाडा उघडण्याच्या प्रक्रियेला अधिक किचकट करून पुरातत्व विभाग जनआंदोलनाची परिस्थिती निर्माण करू पाहत आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे.