एसटी महामंडळाच्या योजनेला घरघर लागली असून, अनेक प्रवाशांना योजना माहिती सुद्धा नाहीत. बाळाला पाजण्यासाठी प्रत्येक बसस्थानकावर असलेल्या हिरकणी कक्षाला नेहमी कुलूप असते. तर काही ठिकाणी कक्ष खुले ठेवण्यात येत असले तरी त्याठिकाणी प्रवाशांची गर्दी राहत असल्याने महिलांना तेथे जाणे असुरक्षित वाटते. परिणामी काही बसस्थानकावरील कक्षांचा वापरच होत नसल्याचे चित्र आहे. देऊळगाव राजा, मेहकर याठिकाणी बसस्थानकाचे काम करण्यात येत असल्याने महिलांना कुठे बसावे, हा मोठा प्रश्न आहे. लोणार येथे आतापर्यंत हिरकणी कक्षच नव्हता. गत आठवड्यापासून याठिकाणी कक्ष सुसज्ज करण्यात आला आहे.
अनेक महिलांना माहितीच नाही
बसस्थानकामध्ये बाळाला दूध पाजण्यासाठी हिरकणी कक्ष असतो, याची अनेक महिलांना माहितीच नाही. बुलडाणा बसस्थानकामध्ये असलेल्या हिरकणी कक्षाला नेहमी कुलूप असते. दरम्यान, ३ जानेवारी रोजी पाहणी केली असता, हिरकणी कक्ष सुरू होता. परंतु कक्षासमोर काही प्रवाशांची वर्दळ राहत असल्याने महिला त्याचा वापर करत नाहीत.
बसस्थानकाच्या बांधकामात हिरकणी कक्ष हरपला
मेहकर : येथील बसस्थानकाचे नवीन बांधकाम सुरू असल्याने जुने सर्व बांधकाम पाडण्यात आले आहे, परंतु यामध्ये हिरकणी कक्ष हरविल्याने महिलांची कुचंबणा वाढली आहे. बसस्थानकावर हिरकणी कक्षाची उभारणी करणे गरजेचे असतानाही मेहकर बसस्थानकात हिरकणी कक्ष नसल्याने महिलांना अडचणी येत आहेत. मेहकर येथील बसस्थानकाचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. जुन्या बसस्थानकामध्ये हिरकणी कक्ष होता; मात्र नवीन बांधकाम करायचे असल्यानेही जुने पूर्ण बांधकाम पाडण्यात आले आहे; मात्र दुसऱ्या जागेवर प्रवास करणाऱ्या महिलांना यांच्यासोबत लहान बाळ आहे, अशा महिलांकरिता हिरकणी कक्षाची उभारणी करणे अत्यंत गरजेचे होते. मात्र मेहकर बसस्थानकात हिरकणी कक्षाची उभारणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे महिला प्रवाशांना लहान बाळाला दूध पाजण्याकरिता अडचणी निर्माण होतात. या बाबींकडे व्यवस्थापकांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. यासोबतच मेहकर येथील महिलांच्या शौचालयाची दुरवस्था झाली आहे. यामुळे महिला प्रवाशांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत.