लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोनातून बरे झालेल्या जिल्ह्यातील १५ रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस (बुरशीजन्य) आजार झाल्याचे समोर आले असून, त्यातील बहुतांश रुग्णांवर नागपूर आणि औरंगाबादमध्ये उपचार करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, मध्यंतरी या आजारामुळे बुलडाण्यातील एकाचा मृत्यूही झाला असल्याचे इएनटी सर्जनचे म्हणणे आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्यांनी किमान २१ दिवस ते तीन आठवड्यानंतर काही काळ नियमित स्वरुपात दंतचिकित्सक, नेत्रतज्ज्ञ आणि इएनटी सर्जनकडून तपासणी करून घेण्याची आवश्यकता असल्याचे सूत्रांनी सांगितले.म्युकरमायकोसिस हा काही वेगळा मोठा आजार असून तो पूर्वीपासून अस्तित्वात आहे. प्रामुख्याने अनियंत्रित मधुमेह, स्टेरॉईड घेतलेल्यांना प्रामुख्याने हा आजार होण्याची भीती असते. म्युकरमायकोसिसलाच आपल्या भाषेत बुरशीजन्य आजार असे म्हणतात. पोस्टकोविड रुग्णांमध्ये प्रामुख्याने हा आजार बळावत असल्याचे निदर्शनात येत आहे. यात प्रामुख्याने दृष्टी कमी होणे, दात दुखणे किंवा तोंडात एक बारीकसा फोड येणे, नाकात वेदना होणे अशी लक्षणे आढळतात. कोविड समर्पित रुग्णालयातून बरे झालेल्या चार जणांमध्ये अशी लक्षणे आढळून आली होती तर नेत्रतज्ज्ञाकडे तीन रुग्णांवर उपचार करण्यात आलेत. दंतचिकित्सकांकडेही आठ रुग्ण येऊन गेले आहेत. दरम्यान, बुलडाणा शहरातील एका रुग्णाला थेट नागपूरला हलवावे लागले होते; मात्र या बुरशीजन्य आजाराचा त्याचा मेंदूत शिरकाव झाल्याने त्याचा मध्यंतरी मृत्यू झाला असल्याची माहिती इएनटी सर्जन डॉ. जे. बी. राजपूत यांनी सांगितले. दरम्यान, वेळेत डॉक्टरांकडे गेल्यास ९९ टक्के जणांचा हा आजार बरा होऊ शकतो. लक्षणे आढळल्यास सायनसचा सिटीस्कॅन, एमआरआय करावा लागतो. त्यात हा आजार डिटेक्ट झाल्यास रुग्णावर इलाज करणे सोपे जाते.
ही आहेत लक्षणेडोळ्याभोवती सुज येणे, दृष्टी कमी होणे, दात दुखणे, तोंडात एखादा फोड येणे, नाकात वेदना होणे व डोके दुखणे ही प्रमुख लक्षणे या आजारात आहेत. प्रामुख्याने अनियंत्रित मधुमेह स्टेरॉईड अधिक प्रमाणात घेतले गेल्यास हा आजार उद्भवण्याची शक्यता असते. मधुमेह असलेल्यांच्या नसांमधील संवेदना बऱ्याचवेळा त्यांच्या लक्षात येत नाहीत व त्यातून हा आजार वाढतो.
आजार प्रत्येकालाच होत नाहीहा आजार प्रत्येकालाच होत नाही. त्यामुळे घाबरून न जाता काही त्रास असल्यास डॉक्टरांकडे तपासणी करावी. आजार असल्यास डोळ्यांच्या डॉक्टरांच्या तो प्रथम लक्षात येतो. या आजाराबाबत पसरत असलेल्या गैरसमजापसून दूर राहून डॉक्टरांचा सल्ला प्रथम घ्यावा, असे नेत्रतज्ज्ञ डॉ. शोन चिंचोले यांनी सांगितले.
काय आहे उपचारकोरोनातून बरे झालेल्यांनी साध्या गरम पाण्याची नियमित वाफ घ्यावी. प्रसंगी आयोडिनचे दोन थेंब नाकात टाकून ते स्वच्छ धूत जावे. तसेच मिथिलीन ग्ल्यू हे १० एमएल अैाषध एक लिटर पाण्यात टाकून त्याने नाक धुतले तरी चालते. यासंदर्भाने इएनटी सर्जनलाही अनुषंगिक सूचना अलीकडील काळात दिल्या गेलेल्या असल्याचे डॉ. राजपूत म्हणाले. १५ हजार रुपयांच्या आसपास मिळणारे ॲन्टी फंगल इंजेक्शनही रुग्णांना दिले जाते.
नियमित गरम पाण्याची वाफ घ्यानियमित गरम पाण्याची वाफ घेण्यासोबतच मिथिलीन ग्ल्यू हे १० एमएल अैाषध एक लिटर पाण्यात टाकून त्याने नाक धुतले तरी चालते. व गरजेनुसार डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. असे डॉ. जे. बी. राजपूत यांनी सांगितले.