वरवट बकाल : ज्या शेतीत वीज कनेक्शनच नाही, त्या शेतकऱ्याला चक्क ८५ हजार रुपयांचे बिल दिल्याचा प्रकार संग्रामपूर तालुक्यातील रुधाना येथे उघडकीस आला आहे. यावरून अन्य शेतकऱ्यांना दिलेली बिलेही फसवी असून, त्याची तपासणी करण्याची मागणी होत आहे.
संग्रामपूर तालुक्यातील रुधाना येथील शेतकरी निवृत्ती विठ्ठल उगळकार यांच्या शेतामध्ये विद्युत जोडणी नाही. त्यांच्या शेतापासून तीन ते चार पोलचे अंतर असून, त्यांना अजून सुद्धा शेतीच्या वापरासाठी वीजपुरवठा मिळाला नाही. शेतात पाणी असल्यावरही केवळ महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याला कोरडवाहू पिके घ्यावी लागत आहेत. ज्या शेतात विद्युत कनेक्शनच नाही, त्यांच्या नावे ८५ हजार रुपयांचे बिल महावितरणने दिले आहे. महावितरणकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या सगळ्या प्रकारची वस्तुनिष्ठ चौकशी करून शेतकऱ्यांच्या नावे आलेले चुकीचे बिल तत्काळ रद्द करावे व शेतकऱ्याला विद्युत पोल देऊन त्यांना विद्युत लाईन देण्यात यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागेल, असा इशारा ‘स्वाभिमानी’चे युवा जिल्हाध्यक्ष अनंत मानकर यांनी दिला आहे.
नऊ वर्षांपासून पोल दिला नाहीरुधाना येथील शेतकरी निवृत्ती विठ्ठल उगळकार यांच्या शेतामध्ये वीजपुरवठा नाही. त्यांनी वीजपुरवठा मिळण्याकरिता सन २०१३ मध्ये २ पोलचे पैसेसुद्धा भरले आहेत. परंतु त्यांना नऊ वर्षे झाली अद्याप पोल मिळाले नाही. त्यामुळे विद्युत कनेक्शनही मिळाले नाही. नऊ वर्षांपासून वीजखांबांची मागणी अपूर्ण असून, चक्क ८५ हजार रुपयांचे बिल देण्यात आले.