सिंदखेड राजा : येथून थेट बुलडाणा किंवा चिखलीला जाण्यासाठी एकही बस नाही. यासंदर्भात सिंदखेड राजातून अनेकवेळा बस सुरू करण्याची मागणी झाली, परंतु बुलडाणा येथील एसटी प्रशासन या मागणीकडे कायमच दुर्लक्ष करीत आले आहे. महामंडळ प्रशासनाचा हा दुजाभाव आहे असा आरोप प्रवाशांकडून होत आहे.
सिंदखेड राजा-बुलडाणा हे अंतर शंभर किलोमीटर आहे. जिल्ह्याचे ठिकाण असल्याने अनेक कामांसाठी प्रवाशांना बुलडाणा जावे लागते, मात्र सिंदखेड राजा येथून प्रथम देऊळगाव राजा तेथून चिखली व पुढे बुलडाणा असा अडचणीचा किंबहुना अडथळ्यांचा प्रवास करावा लागतो. वेळेत त्या त्या कार्यालयात पोहोचले तर कामे होता, अन्यथा पुन्हा सोईच्या दिवशी बुलडाणा प्रवास हाच या भागात प्रवाशांचा क्रम आहे. नेते, पुढारी किंवा स्वत:चे वाहन असलेले लोक आपल्या वाहनातून जातात; पण सर्वसामान्य लोकांना मात्र खेटे खात बुलडाणा गाठावे लागते हे वास्तव आहे. अनेकजण तर मोटारसायकलने प्रवास करतात त्यातही अपघाताचा धोका नाकारता येत नाही.
मातृतीर्थ सिंदखेड राजा हे राज्यातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. जिजाऊंचा वाडा, लखुजी राजांची समाधी, रामेश्वर मंदिर, पुतळा बारव, मोती, चांदणी तलाव असे अनेक प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी येथे पर्यटक येतात. जळगाव, भुसावळ, मलकापूर, बुलडाणा येथील प्रवाशांना थेट बससेवा नसल्याचा फटाका बसत आहे. याकडे एसटी महामंडळाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
प्रवासी संख्या पुरेशी नसल्याने थेट बुलडाणा बस सोडता येत नाही, परंतु मागणी होणार असेल आणि प्रवाशी संख्या असेल तर नव्याने बस सुरू करण्यासाठी विचार केला जाईल.
संदीप रायनवाल, विभाग नियंत्रक, बुलडाणा
सिंदखेडराजा तालुक्यातील अनेक गावांतील लोकांना सरकारी कामांसाठी बुलडाणा येथे जावे लागते; परंतु सिंदखेड राजा या मुख्य स्थानकातून थेट बुलडाणा बस नाही. ग्रामीण भागातील जनतेसाठी बुलडाणा बस थेट चांगेफळ येथून सुरू केल्यास प्रवासी संख्या वाढेल.
जनार्दन मोगल, सरपंच, चांगेफळ