श्रमसंस्कार शिबिराला कोरोनाचा फटका
बिबी : राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर गावोगावी आयोजित करण्यात येते, परंतु कोरोना विषाणू संसर्ग वाढत असल्याने, अनेक ठिकाणी रासेयोचे श्रमसंस्कार शिबिर रद्द करण्यात आले आहे. या श्रमसंस्कार शिबिरालाही कोरोनाचा फटका बसला आहे.
सुंदरखेड येथे पाणीपुरवठ्याला विलंब
बुलडाणा : सुंदरखेड येथे नागरिकांना विलंबाने पाणीपुरवठा होत आहे. मुबलक जलसाठा असताना, १५ ते २० दिवसांआड नळ सोडण्यात येतात. त्यामुळे नागरिकांना आतापासून कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येते.
सिमेंट बंधाऱ्यांचे निकृष्ट काम
दुसरबीड : जिल्हा परिषद सिंचन विभागाच्या वतीने दुसरबीड, बीबी, किनगाव राजा शिवारात झालेल्या सिमेंट बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे दिसून येत आहे. या पावसाळ्याच्या दिवसांत अनेक बंधाऱ्यांतून पाण्याची गळती झाली. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
जानेफळ येथे कोरोनाचा विळखा
जानेफळ : मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे पुन्हा कोरोनाचा विळखा वाढत आहे. ५० पेक्षा जास्त काेराेना रुग्ण आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. दुसरीकडे ग्रामस्थांमध्ये गांभीर्य नसल्याचे चित्र आहे.
अनियमित वीजपुरवठ्याने शेतकरी त्रस्त
धामणगाव बढे : ग्रामीण भागात सध्या मोठ्या प्रमाणावर अनियमित विद्युत भारनियमन सुरू आहे़ सध्या रब्बीचा हंगाम सुरू असल्यामुळे गहू पिकांना पाणी द्यावे लागते. मात्र, वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही.
२० हजारांच्या मयर्यादेमुळे ग्राहक त्रस्त
अंढेरा : येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखेत बँक ग्राहकांना त्यांच्या खात्यातून केवळ २० हजार रुपये काढण्याची मर्यादा ठेवलेली आहे. यापेक्षा जास्त पैसे काढायचे असल्यास दुसऱ्या शाखेत खाते सुरू करण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे बँकेतील ग्राहक अडचणीत सापडले आहेत.
बसेस बायपास मार्गे जात असल्याने प्रवाशी त्रस्त
मेहकर : येथील बस स्थानकावरून सुटणाऱ्या बसेस शहरातील इतर बसस्टॉपवरून प्रवाशांना घेऊन न जाता परस्पर बायपासवरून जात आहेत. बायपास मार्गाने जाणाऱ्या बसेसमुळे प्रवाशांची अडचण होत आहे.