सिंदखेडराजा : भंडारा येथे रुग्णालयाला आग लागल्याची घटना घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सिंदखेड राजा येथील ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली असता अग्निशमन यंत्रणाच कार्यान्वित नसल्याचे धक्कादायक वास्तव समाेर आले. त्यामुळे, भंडारा येथील घटनेची पुनरावृत्ती हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात काही महिन्यांपूर्वी प्रभारी वैद्यकीय अधीक्षक होते. काही महिन्यांपूर्वी रुग्णालयाला डॉ.सुनीता बिरासदार यांची पूर्णवेळ अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी रुग्णालयाचा कायापालट केला आहे. मात्र अग्निशमन यंत्रणा या रुग्णालयात अस्तित्वातच नाही. काही अग्निशमन सिलिंडर येथे होते. परंतु ते बॅक डेटेड झाल्याने बाजूला टाकण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाची सध्या अस्तित्वात असलेली इमारत २००९मध्ये बांधण्यात आली. तत्कालीन अधिकाऱ्यांनी अग्निशमनसारख्या महत्त्वपूर्ण विषयाकडे दुर्लक्ष केल्याने येथील रुग्णालय अग्निशमन यंत्रणेविना आहे. या गंभीर बाबीकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष हाेत असल्याने माेठा अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.