लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना संसर्गाच्या काळात मृतदेह नेण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यात एकही शववाहिका नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सध्याची आपत्कालीन परिस्थिती पाहता बुलडाणा जिल्ह्यात शासकीय तथा खागी रुग्णवाहिका तथा शववाहिका किती आहेत, याची माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून मागविण्यात आली आहे. त्यानुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालयाने एक पत्रच उपप्रादेशिक परिवहन विभागास दिले असून, राज्यातील अन्य जिल्ह्यातूनही अशी माहिती मागविण्यात येत असून, मुंबई येथील आरोग्य विभागास ही माहिती सादर करण्यात येणार आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात एकाच रुग्णवाहिकेत जवळपास २२ पार्थिव नेण्यात आल्याचा कथित प्रकार समोर आला होता. त्या पार्श्वभूमीवर तर ही माहिती संकलित केली जात नाही ना, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, त्याबाबत सूत्रांकडून स्पष्टता मिळालेली नाही. कोरोना संसर्गाच्या काळात रुग्णांना वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचविण्यासोबतच त्यांनी ने-आण करताना त्यांना योग्य सुविधा रुग्णवाहिकेत उपलब्ध करून देण्याचा उद्देश यामागे असावा, असाही कयास व्यक्त केला जात आहे. सोबतच आरोग्य क्षेत्रातील रुग्णवाहिकांची संख्या वाढवून पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याचा यामागे उद्देश असावा, असाही कयास सूत्रांनी व्यक्त केला.
मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापरजिल्ह्यात शववाहिका नसल्याने मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर करण्यात येत असून, तीन रुग्णवाहिका कंत्राटी स्तरावर त्यासाठी लावण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.