लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत २०२१-२२ च्या मजूर अंदाजपत्रक व कृती आराखडयासाठी शिवारफेरीतून नियोजन केले जाणार आहे. मात्र, त्यासाठी शिवारफेऱ्यांचे नियोजन पंचायत समित्यांमध्ये झाले नसल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, २०२० - २१ चा पूरक आराखडाही तयार करण्याचे निर्देश असून वैयक्तिक लाभाच्या कामासोबत जलसंधारणाच्या कामांची निवड होणार आहे. त्या कामांवर ६५ टक्के खर्च करण्याचेही नियोजन करण्याचे बजावण्यात आले. अंदाजपत्रक व कृती आराखडयासाठी शिवारफेरी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आयोजित केल्या जाणार आहेत. यासाठी गावातील सरपंच, ग्रामपंचायतींचे प्रशासक, ग्रामसेवक, रोजगार सेवक, कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामपंचायत स्तरावरील अन्य शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत ही शिवारफेरी होणार आहे. शिवारफेरीदरम्यान कोरोनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे लागणार आहे. तसेच या शिवारफेरीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्तीही होणार आहे. त्यांना ग्रामपंचायतीचे नरेगा क्षेत्रीय नियोजन अधिकारी म्हणून काम करावे लागणार आहे. या शिवारफेरीत गावक ऱ्यांना मार्गदर्शन, गावाची पार्श्वभूमी तयार करणे, गावातील कमीतकमी १० प्रतिनिधींची निवड करणे, गावांचा आराखडा तयार करणे, गावातील महिला, भूमीहीन, शेतमजूर यांच्यासाठीही आराखडा तयार करणे, निवड केलेल्या स्वयंसेवकांची फळी तयार करणे, निवड केलेली गावे कोणत्या योजनेत समाविष्ट आहेत, याची माहिती घेणे, पाण्याचा ताळेबंद तयार करून पिकांचे नियोजन करणे यासह विविध कामे करण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने शिवार फेऱ्यांचे योग्य पद्धतीने नियोजन होणे गरजेचे झाले आहे.
कृती आराखडयासाठी शिवारफेऱ्यांचे नियोजनच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 12:22 PM