चिखली : पेनटाकळी प्रकल्पाचे निर्माते नि:संशयपणे भारत बोंद्रे हेच आहेत. त्यांनी अनेक खस्ता खाऊन चिखली तालुक्यातच नव्हे तर पूर्ण जिल्ह्यात अनेक प्रकल्प राबवून जिल्हा जलमय केला आहे. सुप्रमा मान्यतेसाठीही सर्वांनीच प्रयत्न केले आहेत. यामध्ये आमदार श्वेता महाले यांनीदेखील प्रयत्न केलेले असल्याने ही मान्यता मिळण्यासाठी त्यांचाही खारीचा वाटा निश्चितपणे आहे, असे मत पेनटाकळी प्रकल्पग्रस्त शेतकरी जीवन जाधव यांनी एका प्रसिद्धिपत्रकाव्दारे व्यक्त केले आहे.
आमदारांनी सुप्रमा मान्यतेचे श्रेय घेऊ नये, असा सल्ला राकाँचे शंतनू बोंद्रे यांनी दिला होता. या पृष्ठभूमीवर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी एक प्रसिध्दिपत्रक काढून प्रकल्पग्रस्तांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
यामध्ये पेनटाकळी प्रकल्पाच्या पश्चजलाने बाधित होणाऱ्या घानमोड, मानमोड, पांढरदेव आणि देवदरी या गावांचे पुनर्वसन करण्यासाठी माजी मंत्री भारत बोंद्रे पहिल्यापासूनच प्रयत्नशील आहेत. परंतु, आमदार श्वेता महाले यांनीदेखील या गावांच्या पुनर्वसनासह अन्य कामे पूर्ण होण्यासाठी मिळालेली चतुर्थ सुप्रमासाठी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत. आमदार झाल्याबरोबर त्यांनी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केल्याने रखडलेली सुप्रमा देण्याची कार्यवाही शासनाने केली. यात श्रेय घेण्याचा कोणताही प्रश्न उपस्थित होत नाही. आ. महाले यांनी पेनटाकळी प्रकल्पास मिळालेल्या सुप्रमा प्रस्तावाला मान्यता मिळविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची वस्तुस्थिती मांडली असल्याचे घानमोड येथील प्रकल्प बाधित जीवन जाधव आणि राजेश पाटील या शेतकऱ्यांनी या प्रसिद्धी पत्रकाव्दारे स्पष्ट केले आहे. गेल्या दोन-तीन वर्षापासून आ. महाले यांनी लक्ष घातले आहे. एव्हढेच नव्हे तर या सुप्रमासाठी पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे, मेहकरचे आमदार संजय रायमूलकर यांचेही योगदान विसरता येणार नाही. त्यामुळे हा श्रेयाचा विषय नसून केलेल्या कामाचा आहे. यामध्ये भारतभाऊंचा सिंहाचा वाटा निश्चित आहे आणि त्यात आमदार श्वेता महाले यांचा खारीचा का होईना पण वाटा आहे, हे मान्य करावेच लागेल, अशा भावना या शेतकऱ्यांनी प्रसिध्दिपत्रकाव्दारे दिल्या आहेत.