योगेश फरपटलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : बुलढाणा जिल्ह्यात सध्या तीव्र पाणीटंचाईचे सावट आहे, असे असतानाही बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव व शेगाव नगरपालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. या प्रकाराकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. लोकमतने या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला असता असे निदर्शनास आले आहे की खामगाव चिखली -जालना मार्गावर सध्या बांधकाम सुरू आहे. याशिवाय शेगाव पंढरपूर या महामार्गाचे सुद्धा काम सुरू आहे. सोबतच खामगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे शेगाव आणि खामगाव तालुक्यात तीव्र स्वरुपाची पाणीटंचाई असल्यानंतरही ही या कामासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. एकीकडे नागरिकांना वापरायला तर सोडा प्यायलाही पाणी नाही अशा परिस्थितीत बांधकामासाठी होत असलेला हा पाण्याचा वापर निश्चितच गंभीर स्वरूपाची बाब असल्याचे दिसून येते. नागरिकांनी या संदर्भात तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून सुरू असलेले बांधकाम थांबवण्यात यावे अशी मागणी केली आहे. आधी प्यायला पाणी द्या नंतर विकास करा अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. शेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचे सावट आहे. कालच काँग्रेस समितीने दुष्काळी दौरा केला. खामगाव ते शेगाव या रस्त्यावर असलेल्या चिंचोली या गावांमध्ये भीषण पाणी टंचाई आहे आणि विशेष म्हणजे याच गावाच्या समोर शेगाव पंढरपूर महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जात असल्याचे वास्तव आहे. अशाच प्रकारची परिस्थिती खामगाव तालुक्यातील गणेशपुर येथे आहे या या समोर खामगाव-जालना महामार्गाचे काम सुरू आहे आणि गावात पाणी टंचाई असतानाही गावात पुरेसा पाणी पुरवठा न करता रस्त्याच्या कामासाठी पाण्याचा वापर केला जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी सर्व प्रकारची बांधकामे थांबवण्यात यावी असे स्पष्ट निर्देश दिले आहेत मात्र या प्रकाराकडे कंत्राटदारांनी केले आहे. शेगाव व खामगाव तहसीलदारांच्या नाकावर टिचुन बेकायदेशीर कामे सुरू आहेत. दोन्ही तालुक्यांमध्ये तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई असल्यानंतरही एकाही तहसीलदाराने अद्याप एकाही गावामध्ये भेट दिली नाही. एकीकडे नागरिकांना प्यायला पाणी नाही तर जनावरांना चारा नाही अशी परिस्थिती असताना पाण्याचा होत असलेला हा निश्चितच गंभीर स्वरूपाची बाब असल्याचे दिसून येते.
प्यायला पाणी नाही, महामार्गाच्या बांधकामासाठी पाण्याचा सर्रास वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 3:47 PM