- ब्रम्हानंद जाधव बुलडाणा: मुलांच्या वेगवेगळ्या विचारांचा आदर आपण करायला शिकले पाहिजे. मुलांपर्यंत योग्य साहित्य पोहचविले पाहिजे. मुलांना आपली आवड शोधायला वेळ लागतो. त्यासाठीचा वेध आणि संधी मुलांना उपलब्ध करून द्यावी लागते. म्हणूनच त्यांना त्यांच्या आवडीबदलण्याचं स्वातंत्र्य द्यावं लागतं. घरात पालक आणि मुले यांच्यात मतभेद जरूर असावेत, पण मनभेद नसावेत, असे मत मुंबई येथील मराठी बाल साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजीव तांबे यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
प्रश्न: बाल साहित्य परिषदेचं उद्दिष्ठ काय? उत्तर: विविध भाषेतील बाल साहित्यांचा आणि चळवळींचा तौलनिक अभ्यास करणे आणि बालसाहत्यीकांचा एक दबागट तयार करणे, यासारखे प्रयत्न बालसाहित्य परिषदेच्या माध्यमातून करता येतील. त्यानंतर मुलं वाचनापासून कशी दूर जात आहेत, त्यांचा ओढा कशाकडे आहे, त्यांचे वाचन वाढविण्यासाठी काय करता यईल? यासारख्या अनेक प्रश्नांचा उलगडा या परिषदेत होतो. मुलांपर्यंत दर्जेदार पुस्तके पोहचविणे हे ठळक उद्दिष्ठ बाल साहित्य परिषदेच आहे.
प्रश्न: साहित्य क्षेत्रात गटबाजी आहे का?उत्तर : गटबाजी तर प्रत्येक क्षेत्रात असते. परंतू आज अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि बाल साहित्य परिषद हे दोन गट एकत्र आले आहेत. अखिल भारतीय साहित्य महामंडळ व बाल साहित्य यांच्या एकत्रितपणामुळे साहित्य क्षेत्रातील एक वर्तुळ पूर्ण होत आहे.
प्रश्न: ० ते ६ वयोगटासाठी कसे बालसाहित्य हवे? उत्तर: ० ते ६ वयोगटासाठी बालसाहित्य नाही. त्यासाठी दिल्लीतून पुस्तके आणावी लागत आहेत. शासनाच्या धोरणानुसार बालवाढीसाठी शासनाचा अधिकृत कोर्स नाही. बालवाड्या नाही, त्या अंगणवाड्या आहेत. परंतु त्या उसळवाड्या झाल्या आहेत. ० ते ६ वयोगटासाठी पुस्तके व्हायला पाहिजे. मात्र त्यामध्ये ९० टक्के चित्र आणि १० टक्के मजकूर पाहिजे. तर काही पुस्तके शब्दाशिवाय पाहिजे, असे बालसाहित्य निर्माण करणे आवश्यक आहे.
प्रश्न: शिक्षण आणि साहित्य यांचा संबंध कसा आहे?उत्तर: बालकांना शिक्षणासोबत साहित्याची ओळख महत्वाची आहे. शिक्षणाने आयुष्याला आकार आणि अर्थ देता येईल. स्वत: च्या क्षमतांचा विकास करत जगण्याची दिशा यामुळे सापडते. परंतू सध्या शिक्षण आणि साहित्य यांचा संबंध जोडला गेला नाही. जे टागोर यांनी केले म्हणून ‘करी मनोरंजन शिक्षणातून जो मुलांचे जडेल नाते प्रभुशी तयाचे’ असे वाक्य घ्यायला पाहिजे.
प्रश्न: मुलांमध्ये असलेली ठरावीक विषयांची भिती दूर करण्यासाठी काय करता येईल?उत्तर: गणित आणि विज्ञान याची उपजत भिती मुलांना नसते. ती भिती पालक आणि शिक्षकांकडून मुलांना दाखविली जाते, ज्याचा धसका मुले आयुष्यभर घेतात. दैनंदिन जीवनातील गणित आणि विज्ञान यांचा सहसंबंध जर आपण मुलांना उलगडूण दाखवला तर त्या भितीचे मैत्रीत रुपांतर होईल. जीवनात जोडणारी उदहरणे यामध्ये महत्वाची असतात.
प्रश्न: मुलांना वाचनाची आवड कशी निर्माण करता येईल?उत्तर: मुलांना ज्या साहित्य प्रकारात आवड आहे, ते साहित्य त्यांच्यापर्यंत पोहचले, तर त्यांना ते वाचान करण्याची आवड निर्माण होईल. त्यासाठी मुलांना वेगवेगळे साहित्य प्रकार वाचायला मिळाले पाहिजे. विज्ञानभय कथा, परीकथा, समुद्र कथा हे साहित्य मुलांना मिळत नाही. मी स्वत: मुलांसाठी २७ साहित्य प्रकार लिहिले आहेत. लिहिण्याची हिम्मत दाखवणे अपेक्षीत आहेत.