बुलडाणा : पीसीपीएनडीटी कायदा हा लिंग चाचणी करणाऱ्यांसाठी कर्दनकाळ आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. स्री जन्मासाठी समाजमन बदलले पाहिजे. मुलापेक्षा मुलगी बरी हा संस्कार झाला पाहिजे, असे प्रतिपादन प्र. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. घाेलप यांनी केले.
पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी व मुलींचा जन्मदर वाढविण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नर्सिंग स्कूल हॉलमध्ये पीसीपीएनडीटी कार्यशाळा ३० डिसेंबर २०२० रोजी उत्साहात पार पडली. यावेळी ते बाेलत हाेते.
कार्यशाळेमध्ये मुलींच्या जन्मदर वाढविणे, सोनोग्राफी सेंटरची तपासणी करताना काय काय करावे, मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी अंगणवाडीसेविका व आशा कार्यकर्त्यांची भूमिका याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेला प्र. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. घोलप, मुख्य प्रशासकीय अधिकारी अनिल बागर, जिल्हा सल्लागार समितीच्या डॉ. वैशाली पडघान, विधी समुपदेशक ॲड. वंदना काकडे, शासकीय अभियोक्ता ॲड. संतोष खत्री, शाहीना पठाण, अधिसेविका श्रीमती राठोड आदी उपस्थित होते.
ॲड. वंदना काकडे यांनी यावेळी समुचित प्राधिकारी यांचे कर्तव्य सांगितली. संचालन सचिन सोळंकी यांनी, तर आभार प्रदर्शन के.पी. भोंडे यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी आहारतज्ज्ञ सचिन सोळंकी, के.पी. भोंडे, विवेक जोशी आदींनी प्रयत्न केले. कार्यशाळेला वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.