लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : रेल्वेस्थानके प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी कुल्हडमधून चहा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्यानंतरही शेगाव रेल्वेस्थानकात त्याचा वापर सुरूच झाला नसल्याचे वास्तव शनिवारी (दि. ९) दुपारी केलेल्या पाहणीमध्ये दिसून आले. केंद्रीय रेल्वेमंत्रालयाने सर्व स्थानकांमध्ये कुल्हडमधून चहा देण्याचा उपक्रम सुरू केला. कुल्हड म्हणजे मातीचे बोळके (कप) होय. २००४ ते २००९ दरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी पहिल्यांदा कुल्हडमधून चहा देण्याची अंमलबजावणी केली होती. त्यानंतर आता कुल्हडमधून चहा द्यावा लागणार असल्याने सर्व कंत्राटदारांना कुल्हड खरेदी करून त्यातून चहा विकण्याचे बंधनकारक आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी शेगाव स्थानकात झालेली नाही.
स्थानिक व्यावसायिकांना होणार फायदा!स्थानिक व्यावसायिकांकडून कुल्हड खरेदी केल्यास त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो; मात्र त्याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे, तर सध्या एक कुल्हड दीड ते अडीच रुपयांदरम्यान मिळतो. यामुळे चहाचे दर वाढण्याची शक्यताही त्यातून व्यक्त होत आहे.