दरम्यान, थेट मोबाईल व्हॅन उपलब्ध करून त्या माध्यमातून व्यापारी, लघुव्यावसायिक, फेरीवाले, भाजीपाला विक्रेते व तत्सम सुपर स्प्रेडरच्या व्याख्येत बसणाऱ्यांचे स्वॅब संकलित करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. अर्थात संबंधितांच्या चाचण्या करण्यात येणार आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी एस. रामास्वामी यांनी निर्देश दिले होते. चार दिवसांपूर्वी जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश लागू करून शाळा, महाविद्यालये ही २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तसेच सुपर स्प्रेडरच्या चाचण्यांना प्राधान्य देण्याचे निर्देश पालिका तथा ग्रामीण भागासाठी तहसीलस्तरावर देण्यात आले होते. त्यानुषंगाने बुलडाणा पालिकेने आता पावले उचलली असून सुपर स्प्रेडरच्या चाचण्या करण्याच्या दिशेने पाऊल उचलले असल्याची माहिती पालिका मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
गेल्या एक वर्षापासून कोरोना संसर्गाविरोधातील लढ्यात महत्त्वाची भूमिका बुलडाणा पालिकेने बजावलेली आहे. कोरानामुळे मृत्यू झालेल्या परंतु त्यांच्या अंत्यविधीसाठी समोर न आलेल्या मृतकांच्या पार्थिवावर बुलडाणा पालिकेने पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार केले होते. एक मोठी जबाबदारी बुलडाणा पालिकने कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान उचलली होती.
आता त्याच धर्तीवर बुलडाणा शहरातील सुपर स्प्रेडरच्या व्याख्येत बसणाऱ्या व्यावसायिक, लघु व्यावसायिक, फेरीवाले, हॉटेल व्यावसायिक तथा त्यांच्याकडील कर्मचारी यांच्या चाचण्या करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने २० फेब्रुवारी रोजी बैठक घेण्यात आली. शहरातील व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, फेरीवाले व संघटनेचे अन्य सदस्य या छोटेखानी बैठकीस उपस्थित होते. यावेळी पालिकेने संबंधितांकडील कर्मचारी, कुटुंबातील सदस्य यांची माहितीही संकलित केली. तसेच येत्या दोन ते तीन दिवसा संदिग्ध वाटणाऱ्यांचे स्वॅब घेण्यासाठी एका मोबाईल व्हॅनचीही उपलब्धता करण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे म्हणाले.
--७०० जणांची माहिती संकलीत--
शहरात व्यापारी, फेरीवाले, छोटे व्यावसायिक मिळून जवळपास ७०० जणांच्या चाचण्या करण्याचे नियोजन आहे. संबंधितांची माहितीही संकलित करण्यात येत आहे. पालिकेचे उपमुख्याधिकारी स्वप्निल लघानेही याकामी महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. ही माहिती संकलित झाल्यानंतर प्रत्यक्ष चाचण्यांना प्राधान्य दिले जाईल.