- सोहम घाडगे लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ३९ शाळांमध्ये नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्रे साकारण्यात येणार आहेत. वैज्ञानिक उपकरणे प्रत्यक्ष हाताळण्याची संधी यामाध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.समग्र शिक्षा अभियानांतर्गत सन २०१९ -२० या वर्षात मराठी आणि उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्रे साकारले जात आहे. या केंद्राच्या उभारणीसाठी राज्याकडे उपलब्ध असलेल्या यु- डायस २०१८-१९ च्या माहितीवरुन आणि जिल्हा परिषद, नगरपालिककेत असलेल्या गट, शहर साधन केंद्रातील शाळेमध्ये अतिरिक्त स्वतंत्र वर्गखोली, विद्यूत सुविधा, शाळेची पटसंख्या इ. निकषांना आधारभूत ठेऊन नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारणीसाठी शाळांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील मराठी माध्यमाच्या २८ व उर्दू माध्यमाच्या ११ अशा एकूण ३९ शाळांना विज्ञान केंद्र उभारणीसाठी साहित्य राज्यस्तरावरुन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना शाळेत विद्यूत जोडणी असलेली ५०० चौरस फूट आकाराची आरसीसी स्लॅब असलेली खोली पुरवठादारास तातडीने उपलब्ध करुन द्यावी लागणार आहे. विज्ञान केंद्र उभारणीच्या प्रक्रियेसाठी शाळेत गणित, विज्ञान शिक्षकांची नेमणूक करण्यासह मुख्याध्यापकांना स्वत: या कामात लक्ष घालावे लागणार आहे. मोताळा तालुक्यातील बोराखेडी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी शाळेत सुसज्ज खोली व सर्व सुविधा उपलब्ध असून दोन विज्ञान शिक्षक नियुक्त असल्याचे सांगितले.
विज्ञान केंद्र मंजूर झालेल्या मराठी शाळाचिखली तालुक्यातील वरखेड, खामगाव तालुक्यातील अंत्रज, हिवरखेड, देऊळगावराजा तालुक्यातील मेहुणा राजा, खल्याळ गव्हाण, पिंपळगाव चिलमखाँ, मोताळा तालुक्यातील बोराखेडी, लोणार तालुक्यातील जांभूळ, पांग्रा डोळे, मांडवा, मलकापूर तालुक्यातील हरसोळा, वाघुड, वरखेड, मेहकर तालुक्यातील अंत्री देशमुख, आरेगाव, बोरी, जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा बु., सुनगाव, पळशी सुपो, नांदुरा तालुक्यातील वाडी महाळूंगी, आलमपूर, संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा, शेगाव तालुक्यातील पहूरझिरा, चिंचोली, सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा, देऊळगाव कोळ, उमरद येथील मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये नाविन्यपूर्ण विज्ञानकेंद्र मंजुर झाले आहे.
विज्ञान केंद्र मंजूर झालेल्या उर्दू शाळाविज्ञान केंद्रे मंजूर झालेल्या उर्दू शाळांमध्ये बुलडाणा तालुक्यातील बुलडाणा, धाड, देऊळघाट, चिखली तालुक्यातील उंद्री, खामगाव तालुक्यातील कंझरा, मोताळा तालुक्यातील कोथळी, राजूर, नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी, संग्रामपूर तालुक्यातील बावनबिर, आलेवाडी, शेगाव तालुक्यातील अळसनाचा समावेश आहे.
नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्रांमुळे विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागेल. विज्ञान केंद्र पाहण्यासाठी मोठ्या शहरात जाण्याची गरज पडणार नाही. आपल्याच शाळेत विज्ञानाचे प्रयोग करण्यासह वैज्ञानिक उपकरणे हाताळण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळेल.- डॉ. श्रीराम पानझाडेशिक्षणाधिकारी, जि. प. बुलडाणा