स्व.बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग बुलडाणा जिल्ह्यातून मेहकर तालुक्यातील बेलगाव ते सिंदखेडराजा तालुक्यातील सावरगाव माळ असा ९० कि.मी.जात आहे. मेहकर तालुक्यातील आंध्रुड,उमरा,पिंप्रीमाळी,अंजनी, परिसरातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी महामार्ग संघर्ष समितीच्या माध्यमातून संरक्षण भिंतीपासून १५ फूट सर्व्हिस रोड करण्याची मागणी रेटून धरत आंदोलने केली. खा.प्रतापराव जाधव व आ.संजय रायमूलकर यांच्या भेटी घेऊन मागणी पूर्ण करण्याची विनंती केली होती. फेब्रुवारी महिन्यात खा.प्रतापराव जाधव व आ.संजय रायमूलकर यांनी महामार्ग अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष शेतीवर बोलावून आंदोलन समिती व अधिकारी यांच्या चर्चेत समन्वय साधून दहा फुटाचा सर्व्हिस रोड तयार करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी मान्य करून वरिष्ठांना कळवण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतरही खा.प्रतापराव जाधव व आ.संजय रायमूलकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री(रस्ते विकास) एकनाथ शिंदे,रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार यांच्या भेटी घेतल्या.त्यामुळे मुख्यमंत्री, बांधकाम मंत्री, व्यवस्थापकीय संचालक यांनी दहा फूट सर्व्हिस रस्ता करण्याबाबत आश्वासन दिल्याचे स्वीय सहायक रूपेश गणात्रा यांनी कळवले आहे.
समृद्धी महामार्गाच्या दुतर्फा सर्व्हिस रोड होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 4:34 AM