नीलेश जोशी / खामगाव: रेतीची अवैध वाहतूक रोखण्यासोबतच पर्यावरणाचे संभाव्य नुकसान टाळण्याच्या दृष्टिकोनातून बुलडाणा जिल्ह्यात अल्पावधीतच रेतीच्या वाहतुकीसाठी स्मार्ट एसएमएसटीएस प्रणाली कार्यान्वित करण्यात येत आहे. दरम्यान, रेतीच्या अवैध वाहतुकीवर कारवाई झाल्यास आता रेती तस्करांना थेट ११ महिने जेलची हवा खावी लागणार आहे. त्यानुषंगाने बुलडाणा जिल्हाधिकार्यांनी नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन आनुषंगिक कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. एमपीडीए अर्थात महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंध कायद्यामध्ये डिसेंबर २0१५ मध्ये काहीसा बदल करण्यात आला असून, रेती तस्कर आणि रेशनच्या धान्याचा काळाबाजार करणार्यांना या कायद्याच्या कक्षेत आणण्यात आले आहे. त्यासंदर्भातच अभ्यास करून जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी जिल्ह्यातील रेती घाटधारक, तहसीलदार आणि संबंधित यंत्रणांची बैठक घेऊन प्रकरणी कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. दुसरीकडे अकोला जिल्ह्यात सुरू झालेली एसएमएसटीएस प्रणालीद्वारे बुलडाणा जिल्ह्यात अद्याप कार्यान्वित झाली नाही. ती कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयात घाटधारक, वाहतूकदार आणि तहसीलदारांची बैठक घेऊन ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासंदर्भात मार्गदर्शन करीत आनुषंगिक प्रशिक्षणही कर्मचार्यांना देण्यात आले आहे. अल्पावधीतच ही प्रणाली कार्यान्वित होणार आहे; मात्र सध्या औरंगाबाद खंडपीठात मनोज मोरे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील रेती घाटातून रेतीचे उत्खनन आणि वाहतूक बंद करण्यात आली आहे. परिणामस्वरूप लिलाव झालेल्या रेती घाटाच्या संदर्भात वाहतुकीसाठी देण्यात आलेल्या बारकोडिंगची पावती पुस्तके खनिकर्म विभागाने परत घेतली आहे.
रेती तस्करांवर फास आवळणार!
By admin | Published: February 08, 2016 2:20 AM