बुलडाणा: जिल्ह्यात सोमवारी रात्री पाझिटीव्ह अहवाल आलेले ते दोन्ही रुग्ण सिंदेखड राजा आणि शेगाव येथील आहेत. त्यामुळे आता बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या ११ वर पोहोचली आहे. दोन्ही तालुक्यात क्लस्टर प्लॅन अॅक्टीव करण्यात आला आहे. कोरोना बाधीत रुग्ण आढळलेला परिसर सील करण्यात आला आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा हळूहळू पसार वाढत आहे. बुलडाणा शहरापाठोपाठ चिखली, खामगाव तालुक्यातील चितोडा व देऊळगाव राजा तालुक्यात कोरोना बाधीत रुग्ण सापडले होते. सोमवारी रात्री आणखी दोन रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. यामध्ये शेगाव आणि सिंदखेड राजा येथील हे रुग्ण आहेत. आता कोरोना संसर्गाने जिल्हाभर शिरकाव केला असल्याचे दिसून येत आहे. परिणामी इतर शहरातील नागरिकांमध्येही धास्ती निर्माण झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा, चिखली, बुलडाणा, खामगाव आणि शेगाव हे पाच तालुके आता कोरोनासंसर्गग्रस्त झाले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातून आतापर्यंत ११४ जणांचे स्वॅब नमुने पाठविण्यात आलेले आहेत. त्यापैकी आतापर्यंत ८६ स्वॉबचे नमुने प्राप्त झाले आहेत. त्यातील ११ जणांचे पॉझीटीव्ह अहवाल आले आहेत. अद्याप २८ जणांचे स्वॅबचे नमुने येणे बाकी आहे. शेगाव आणि सिंदखेड राजा तालुक्यातही प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटीव्ह आल्यामुळे या तालुक्यातही आता क्लस्टर प्लॅन अॅक्टीव करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील हायरिस्क झोनमधील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी व सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
‘ते’ दोन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण शेगाव, सिंदखेड राजातील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 4:43 PM