बुलडाणा : नारीशक्तीच्या आंदोलनासमोर हतबल झालेल्या जिल्हा प्रशासनाला पिंपळगाव देवी येथील देशी दारूचे दुकान बंद करण्याचे आदेश द्यावे लागले.; मात्र हे दुकान बंद होऊन काही महिने उलटत नाही तोच पुन्हा हेच देशी दारूचे दुकान मोताळा तालुक्यातील आव्हा येथे सुरू करण्यासाठी दुकान मालकाने घाट घातला असून, त्यासाठी आव्हा येथे १३ मे रोजी महिला ग्रमसभा बोलाविण्यात आली आहे. या सभेला महिलांनी उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. मोताळा तालुक्यातील पिंपळगाव देवी येथील अवैध देशी दारूचे दुकान बंद करण्यात यावे, अशी मागणी करीत अस्तित्व महिला मंडळाच्या प्रेमलता सोनोने आणि परिसरातील महिलांनी तब्बल दोन वर्ष जिल्हा प्रशासन आणि दारू दुकानदाराशी लढा दिला. मोर्चे, आंदोलने तसेच उभी बाटली, आडवी बाटलीचे मतदान घेण्यापर्यंत महिलांनी संघर्ष केला. अखेर जिल्हा प्रशासन व दारू लॉबी हतबल झाली आणि पिंपळगाव देवी येथील त्या वादग्रस्त देशी दारू दुकान मालकाला आपला गाशा गुंडाळावा लागला. हे दुकान प्रशासनाने बंद करण्याचे आदेश दिले. दारूचे दुकान बंद होऊन काही महिने उलटत नाही तोच पुन्हा हेच देशी दारूचे दुकान आव्हा गावात सुरू करण्याचा घाट घालण्यात आला आहे. आव्हा येथील इंदिराबाई प्रकाश घोंगटे या सरपंच आहेत. त्यांच्याच नावावर या देशी दारू दुकानाचा परवाना आहे. हे दुकान आव्हा येथे सुरू करण्यासाठी सरपंचांनी १३ मे रोजी बेकायदेशीररित्या महिलांची विशेष सभा बोलावली आहे. या ग्रामसभेत महिलांच्या सह्या घेऊन दुकानाला कोणाचाही विरोध नाही, असा ठराव घेण्याची दाट शक्यता असल्याने १३ मे रोजीची ही विशेष सभाच प्रशासनाने रद्द करावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे आव्हा येथील अनिल ओंकारराव निंबाळकर आणि कल्पना मनोहर पुरी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. या निवेदनावद आव्हा येथील १२६ महिला पुरुषांच्या सह्या आहेत. पिंपळगाव देवी येथून बंद करण्यात आलेले देशी दारूचे दुकान आता आव्हा गावात थाटण्यात येणार असल्याने या दुकानाला गावकर्यांचा तीव्र विरोध होत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
‘ते’ वादग्रस्त दारू दुकान आव्ह्यात
By admin | Published: May 12, 2015 12:12 AM