काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी चिखली शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांचा दुसरा हफ्ता देण्याची मागणी केली होती. त्यावर टीका करताना भाजप शहराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी अभ्यास करूनच मागणी रेटावी, असा उपरोधिक सल्ला दिला होता. या टीकेच्या प्रत्युत्तरादाखल न. प. गटनेते मो.आसीफ यांनी एका प्रसिद्धपत्रकाद्वारे देशमुख यांच्यावर निशाणा साधला. त्यानुसार, चिखली नगर परिषदेअंतर्गत पंतप्रधान आवास योजनेच्या मंजूर ११३९ घरकुलांना केंद्र शासनाकडून येणारे अनुदान २०१७ पासून अप्राप्त आहे. घरकुल बांधणारे गरीब लाभार्थी त्यासाठी हेलपाटे मारीत आहेत. या लाभार्थ्यांना खरतर त्यांना अनुदान मिळवून देण्याची जबाबदारी विद्यमान आमदाराची आहे. कारण त्या लोकप्रितिनिधी आहेत, असे असतानाही राजकारण विसरून राहुल बोंद्रे यांनी मुख्यमंत्री व नगरविकासमंत्री यांच्याकडे अनुदान मिळण्यासाठी विनंती केली. त्या निवेदनामध्ये कोणावरही आरोप केला नाही, असे असताना पंडितराव देशमुख यांना गैर असे काय वाटले, असा टोला त्यांनी लगावला. म्हाडाने उपयोगीता प्रमाणपत्र दिले नाही, म्हणून दुसरा हप्ता अप्राप्त आहे, असे हस्यास्पद कारण देणारे पंडितराव व त्यांचे नेत्यांनी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रयत्न का केले नाही, असा प्रश्नही मो. आसिफ यांनी उपस्थित केला. सोबतच आरोप केल्यापेक्षा मतदारसंघातील विकासकामांकडे लक्ष घालावे. एक वर्ष तर आरोप करण्यातच निघून गेले आहे, परिणामी चिखली मतदारसंघाची विकासगती शून्य झाली आहे, असेच राहिले तर उरलेली वर्षेही अशीच निघून जातील, असा मो.आसिफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.
त्यांनी शाहणपण शिकवू नये : मो. आसिफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 4:34 AM