मुळात मधल्या काळात मोताळा शहरात किराणा दुकानातील साहित्य चोरण्याचा चोरट्यांनी मोठा सपाटा लावला होता. त्यानंतर आता खाद्यतेल चोरी झाले आहे. त्यातच तेलाचे भावही अशात आणखी दहा रुपयांनी वाढल्याने चोरट्यांनी त्यांचा मोर्चा खाद्यतेलाकडे वळविला असल्याचे दिसते. मोताळ्यातील आठवडी बाजारात मोहम्मद नासिर मोहम्मद मंसूर अबला यांचे किराणा दुकान आहे. गुरुवारी मध्यरात्री दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानासमोर ठेवलेले सुमारे ६०० लिटर खाद्यतेल असलेलेले तिन्ही ड्रम लंपास केले. जवळपास ९० हजार रुपये किंमतीचे खाद्यतेल त्यात होते. शुक्रवारी सकाळी ही चोरीची घटना घडकीस आली. प्रकरणी मोहम्मद नासीर मोहम्मद मंसूर अबला यांनी बोरखेडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात शनिवारी गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास ठाणेदार माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अशोक रोकडे हे करीत आहेत.
--गस्त वाढविण्याची मागणी--
मोताळ्यात गेल्या काही महिन्यापासून चोरट्यांनी किराणा दुकानदारांना लक्ष्य केलेले आहे. त्यातच आता खाद्यतेल चोरीची ही घटना घडली. त्यामुळे बोरखेडी पोलिसांनी मोताळा शहर परिसरात रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.