लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : जिल्हा परिषद तसेच खासगी शाळांमधील साहित्य लंपास करणारी टोळी सक्रीय असून, बोथाकाजी व शिर्ला नेमाणे या दोन गावातील शाळांमधील इलेक्टॉनिक वस्तूंची चोरी झाली आहे.तालुक्यातील बोथाकाजी येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेत अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून एलईडी टीव्हीसह इतर साहित्य असा १८ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी घडली होती. त्यानंतर आता पुन्हा शिर्ला नेमाणे येथील जी. व्ही. मेहता गुप्तेश्वर माध्यमिक विद्यालयात चोरी झाली. या शाळेतील अज्ञात चोरट्याने चार खोल्याचे कुलुप तोडून ७२,७५० रूपयांचे साहीत्य लंपास केल्याची तक्रार हिवरखेड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, सध्या कोरोणा विषाणुचा संसर्ग सुरुअसल्याने सर्व शिक्षक व मुख्याध्यापक इयत्ता पाचवी ते दहावीचे ऑनलाईन क्लासेस सुरू आहे. ऑनलाईन क्लासेस घेण्यासाठी शाळेत संगणक, प्रोजेक्टर व इतर आवश्यक साधन सामग्री आहे. शाळेच्या सुरक्षेसाठी सीसी कॅमेरे लावण्यात आले आहेत. दररोज कामकाज आटोपल्यानंतर दुपारी २.३० वाजता शाळा बंद करण्यात येते. शाळेच्या आजूबाजूला लोकांची वस्ती असल्याने रात्री उशीरापर्यंत वर्दळ असते. १७ मार्च रोजी शाळा उघडतेवेळी शाळेच्या चार खोल्यांचे कूलप तोडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर खोल्यांमध्ये पाहणी केली असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले. बोथाकाजी येथेही शाळेत चोरी झाली होती. या घटनेची शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेख सादिक शेख रशीद, माजी उपसरपंच शेख कडू , शिक्षक मो . हुसैन मो. आजम यांनीही पाहणी केली. अज्ञात चोरट्याने ही चोरीे केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याने खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये मुख्याध्यापक यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर लगेचच शिर्ला नेमाणे येथेही चोरी झाली आहे. कोरोनामुळे शाळा बंद आहेत. याचा फायदा घेऊन चोरी करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे.
शाळेतील साहित्य लंपास करणारी टोळी सक्रीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 12:16 PM