रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांसोबत रात्रभर गव्हाच्या पिकांत बारी दिली. सिंचन करताना शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शिवाय जेवणाची वेळ आली तेव्हा सर्वांनी शेकोटी पेटवून एका जागी चटणी-भाकरीचा आस्वाद घेतला. यावेळी तुपकरांमधील शेतकरी दिसून आला. तालुक्यातील नांद्राकोळी येथील श्रीकृष्ण काळवाघे यांच्या शेतात पिकाला पाणी देत त्यांनी जागरण केले. शेतकऱ्यांच्या पोराला शेतीतली कामे शिकवावी लागत नाहीत. रविकांत तुपकर शेतकऱ्यांचे नेते झाले असले तरी त्यांनी आपली मातीशी नाळ कधी तुटू दिली नाही. जिल्ह्यातील शेतकरी त्यांच्या पाठीशी उभा असल्याचे वेळोवेळी प्रकर्षाने जाणवते. हेच रात्रपाळीत बारी दिल्यावरून स्पष्ट होते. यावेळी राम हुडेकर, भागवत काळवाघे, संजय काळवाघे, राजेश काळवाघे, गजानन घुबे, विजय काळवाघे, मोहन जाधव, दीपक काळवाघे व इतर शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांची फरफट दूर करा !
उद्योगांना पूर्णवेळ वीज, पाणी मिळते, पायाभूत सुविधा मिळतात. पण शेतकऱ्यांना सुविधा तर सोडाच पूर्णवेळ वीजही मिळत नाही. रात्री फक्त आठ तासच वीजपुरवठा होतो. वन्यप्राणी, साप-विंचूकाट्याची पर्वा न करता शेतकरी अन्नधान्य निर्मितीचे काम करतो. शेतकऱ्यांना वेगळा न्याय का, असा सवाल करत तुपकरांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. नवीन वर्षात दोन्ही सरकारांनी शेतकऱ्यांना पूर्ण वेळ वीज व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत, रात्री शेतात राबण्याची फरफट दूर करावी, अशी अपेक्षाही तुपकरांनी व्यक्त केली.