जिजाऊ जयंतीनिमित्त मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे राज्यभरातून जिजाऊ भक्त लाखोंच्या संख्येने येतात. मात्र, यंदा कोरोना नियम लागू असल्याने, तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांनी ११ व १२ जानेवारी रोजी शहरात १४४ कलम लागू केल्याने जिजाऊ भक्तांचा हिरमोड झाला आहे. मात्र, सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही कसूर राहू नये यासाठी सुरक्षेची तपासणी करण्यात आली. पोलीस निरीक्षण शेगोकार यांच्या पथकाने साेमवारी राजवाडा व जिजाऊ सृष्टी येथे शेरा श्वानाच्या मदतीने तपासणी केली.
दोनशे पोलिसांचा ताफा सज्ज
१४४ कलम लागू असल्याने शहरात कोणीही दाखल होऊ नये यासाठी सिंदखेडराजाकडे येणारे सर्व रस्ते दुपारी ४ वाजेपासून सील करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षण जयवंत सातव यांनी दिली. दरम्यान, शहरातील सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात २ उपविभागीय पोलीस अधिकारी, ३ पोलीस निरीक्षक, १३ सहायक पोलीस निरीक्षक, १७५ पोलीस कर्मचारी, तर प्रत्येकी ३० जणांचे दोन आरसीपी पथके शहरात व शहराच्या सीमेवर तैनात करण्यात येणार आहेत.
राजवाडा बंदच राहणार
जिजाऊंच्या दर्शनासाठी लाखोंची गर्दी होते तो राजवाडा यावर्षी मात्र सर्वसामान्यांसाठी बंद असणार आहे. १२ जानेवारी रोजी मराठा सेवा संघ व नगर परिषदेकडून होणाऱ्या महापूजेसाठी राजवाडा उघडला जाणार आहे. या पूजेसाठी केवळ २० महत्त्वाच्या व्यक्तींनाच परवानगी असणार आहे.