खामगाव : येथून जवळच असलेल्या ‘तपोवन’ आश्रमातून अचानक निघून गेलेल्या शंकर महाराजांचा शोध घ्यावा. तसेच शंकर महाराजांना मनस्ताप देणाऱ्या दुष्टप्रवृत्तींना तात्काळ अटक करा, या मागणीसाठी महाराजांच्या अनुयायांनी सोमवारी सकाळी ग्रामीण पोलिस स्टेशनसह उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयावर धडक दिली.
खामगाव येथील जागृती आश्रमाचे मठाधिपती शंकर महाराजांना आश्रमातील काहींजणांसोबतच शाळेतील शिक्षकांकडून मनस्ताप दिला जात आहे. या प्रवृत्तीमुळे संस्थेत गल्लीच्छ राजकारणाचा शिरकाव झाला. दबावतंत्र असह्य झाल्याने महाराजांनी आपल्या विश्वासू सहकाऱ्याजवळ चिठ्ठी सोपवून रविवारी सकाळी तपोवन सोडले. ही बाब वाऱ्यासारखी पसरताच, महाराजांचे मूळ गाव असलेल्या प्रिंपाळा येथील अनुयायांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. प्रिंपाळा, शेलोडी, टेंभूर्णा, लाखनवाडा, बोरी अडगाव, आंबेटाकळी, खामगाव येथील शेकडो भाविकांनी सकाळीच शेलोडी येथील जागृती आश्रमात धडक दिली. त्यानंतर भाविकांचा हा जत्था ग्रामीण पोलिस स्टेशनवर गेला. येथे पोलिस निरीक्षक रफिक शेख यांच्याशी चर्चा केल्यानंतर भाविकांनी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्याकडे आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
शंकर महाराजांना मनस्ताप देणाऱ्यांमध्ये गोपाळ टिकार, प्रभुदास टिकार, रमेश टिकार, प्रदीप गावंडे, महादेव धांडे यांची नावे समाविष्ट आहेत. उपरोक्त पाच जणांचा यामध्ये प्रत्यक्ष सहभाग असला तरी, बोरी अडगाव आणि टेंभूर्णा येथील काही पालकांचाही यामध्ये अप्रत्यक्ष सहभाग आहे. काही पालकांनी मुख्य कार्यकारी निवेदन देत, प्रदीप गावंडे यांच्या अनुपस्थितीबाबत तसेच शाळेच्या समस्यांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. उपोषणाची धमकीही दिली होती. यामध्ये सुधीर टिकार, अच्युत टिकार, अनिल टिकार, सुधाकर टिकार, उत्तम टिकार, नारायण टिकार यांचा समावेश होता. त्यांनी दिलेल्या निवेदनाची प्रतही पोलिसांना भाविकांनी यावेळी दिली. या गलीच्छ राजकारणामुळेच महाराजांची मनस्थिती विचलित झाली. पालकांना आंदोलनासाठी प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोपही यावेळी भाविकांनी केला. त्यामुळे महाराजांना मनस्ताप देणाऱ्या प्रत्येकावर कठोर कारवाईची मागणीही यावेळी भाविकांनी लावून धरली. यावेळी पोलिसांना निवेदनही देण्यात आले.
आमदारांचे प्रयत्न निष्फळ!जागृती आश्रमातील वाद मिटविण्यासाठी खामगाव मतदार संघाचे आमदार अॅड. फुंडकर यांनी प्रयत्न केले. संस्थेच्या प्रत्येक सदस्यांना त्यांनी महाराजांची भूमी आणि संस्था महाराजांच्या ताब्यात देण्याचाही तोडगा आमदारांनी काढला होता. महाराजांच्या समर्थनार्थ काही जणांनी राजीनामा दिला. तर इतरांनी राजीनामा न देता, दबावतंत्राचा अवलंब केला. त्यामुळे याप्रकरणी आमदारांचेही प्रयत्न निष्फळ ठरल्याची चर्चा आहे.
आश्रमाची जमीन बळकावण्यासाठी तसेच संस्था काबीज करण्यासाठी महाराजांना मनस्ताप दिल्या जात होता. त्रास असह्य झाल्यामुळेच महाराज निघून गेले. जबाबदार असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई केली जावी.-विठ्ठल पेसोडे, सरपंच प्रिंपाळा, ता. खामगाव.
भाविकांकडून तीव्र भावना व्यक्त होणे स्वाभाविक आहे. पोलिस प्रशासनाकडून त्यांना सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल. कायदा हातात घेण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. महाराजांनी लिहीलेल्या चिठ्ठीत नमूद असलेल्यांचा पोलिसांकडून शोध घेतल्या जात आहे.- रफीक शेख, निरिक्षक, ग्रामीण पोलिस स्टेशन, खामगाव.