मासरूळ : कोविड काळात ज्या कर्मचाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता रुग्णसेवा केली, त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवरच आज उपासमारीची वेळ आली आहे. ४१ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले असून, त्यांना प्रशासनाकडे वेतनासाठी अनेक वेळा चकरा माराव्या लागत असल्याचे दिसून येते.
बुलढाणा जिल्ह्यात कोविड १९ मध्ये जिल्हा प्रशासनाने विविध पदांवर कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती केली होती. यामध्ये प्रामुख्याने आरटीपीसीएल जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय व कोविड सेंटर अशा ठिकाणी या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. कालांतराने कोविडची साथ कमी होत गेली. त्यामध्ये कंत्राटी कर्मचारी हे कार्यमुक्त करण्यास जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली. सर्वात शेवटी कार्यमुक्त केलेले ४१ कर्मचारी आजही आपल्या वेतनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. परंतु जिल्हाधिकारी यांच्याकडे या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याबाबत सांगण्यात आलेले आहे. कोविडच्या काळात ज्यांनी आपल्या जिवावर उदार हाेऊन काम केले, ज्या काळात कोणीही काम करण्यास तयार नव्हते, त्या काळामध्ये या कर्मचाऱ्यांनी आपल्या जिवाची बाजी लावून रुग्णांची सेवा केली अशाच कर्मचाऱ्यांवर आज उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे विविध निवेदनांद्वारे वेतन अदा करण्याची मागणी केलेली आहे. परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. हे वेतन न मिळाल्यास १ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
आतापर्यंत जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, त्याचप्रमाणे मंत्री अनिल पाटील, मंत्री गिरीश महाजन यांनासुद्धा याबाबतचे निवेदन दिले. परंतु यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे आम्ही १ ऑक्टोबरपासून उपोषणास बसणार आहोत.-दिनेश जाधव, डाटा एन्ट्री ऑपरेटर, जिल्हा रुग्णालय बुलढाणा.
नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी व प्रशासनाने या विषयाचे गांभीर्य ओळखून आमचे वेतन अदा करण्यासाठी प्रयत्न करावे, अन्यथा आम्हाला उपोषणास बसावे लागेल.-कृष्णराव देशमुख, डाटा एन्ट्री ऑपरेटर, जिल्हा रुग्णालय बुलढाणा.