अनिल उंबरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, शेगाव (विवेक चांदूरकर, खामगाव जि. बुलढाणा): येथील श्री गजानन महाराज संस्थानमधील मंदिरात श्रीराम जन्मोत्सव मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. याठिकाणी रामलल्लासाठी फुलांनी सजवलेला पाळणा दर्शनार्थीचे आकर्षणाचे केंद्र बनला होता. भाविकांनी श्रींच्या समाधी दर्शनानंतर रामलल्लाचे दर्शन घेतले.
श्रीराम नवमीनिमित्त दुपारच्या समयी ह भ प श्रीराम बुवा ठाकूर यांनी किर्तनातून प्रभु श्रीरामाचा महिमा सांगितला. श्रीराम जन्मोत्सवाचे वर्णन कथन करताच ‘श्रीराम जय राम जय जय राम’ चा एकच जयघोष झाला. श्रींच्या मंदिरात सनई, चौघडा, ढोल, नगारा या मंगलवाद्याचा समावेश होता. भाविकांनी श्रीराम मंदिराचे दिशेने फुल पाकळ्याची उधळण करत श्रीराम जय राम जय जय राम, गण गण गणात बोते, जय गजानन, श्री गजानन, जय श्रीराम, जय जय श्रीराम चा जयघोष केला.श्री संस्थेद्वारा १३० वा श्रीरामनवमी उत्सव ९ ते १७ एप्रिलपर्यंत धार्मिक प्रथा-परंपरेनुसार संपन्न झाला.
या उत्सवात दरारोज सकाळी ६.०० ते ६.४५ काकडा. ७.१५ ते ९.१५ गाथा भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ५.१५ ते ६.०० हरिपाठ व रात्री ८ ते १० श्रीहरी कीर्तन संपन्न झाले. सप्ताहात ह.भ.प.अनंत बिडवे, बार्शी, ह.भ.प. राजेंद्र आंबेकर, केकतनिंभोरा, ह.भ.प. बळीराम दौड, अकोला, ह.भ.प. अनिरूद्ध क्षिरसागर, सावरगांव माळ, ह.भ.प. गणेश हुंबाड, महागांव, ह.भ.प. अमोल कासलीकर, कासली, ह.भ.प. विठ्ठल राठोड, ह.भ.प. रामभाऊ उन्हाळे, शेगांव, ह.भ.प. श्रीहरी वैष्णव, जालना व ह.भ.प. श्रीराम ठाकूर, परभणी यांचे श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन संपन्न झाले. तसेच श्री अध्यात्म रामायण स्वाहाकारास चैत्र शु. ५ ला प्रारंभ होवून चैत्र शु. ९ ला सकाळी १० वाजता यागाची पुर्णाहूती झाली. दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सवाचे श्रीहरी कीर्तन होवून नामस्मरणाचे जयजयकारात, टाळ, मृदंग, नगारा व मंगलवाद्याचे गजरात श्रीरामजन्मोत्सव संपन्न झाला.
सर्व शाखांमध्ये रामनवमी उत्सव
उत्सवकाळात शेगांवसह, शाखा पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पंपासरीवर, ओंकारेश्वर, गिरडा अशा सर्व शाखांवर रामनवमी उत्सव संपन्न होऊन १,५०,००० चे वर भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.